होमपेज › Konkan › जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ‘घंटानाद’

जुनी पेन्शन हक्क संघटनेचे ‘घंटानाद’

Published On: Apr 08 2018 2:12AM | Last Updated: Apr 08 2018 12:40AMरत्नागिरी : प्रतिनिधी

जुनी पेन्शन पद्धती लागू करावी या मागणीसाठी शनिवारी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने शासनाच्या विरोधात घंटानाद आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनकर्त्यांनी धरणे धरले होते.

हे आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर खाडे, कार्याध्यक्ष राहुल तुगावकर, सरचिटणीस अमोल उमाप, सल्लागार उमेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अंशदायी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचार्‍यांचे भविष्य अंधारात टाकणारी आहे. त्याविरोधात असंतोष असून, जुन्या पेन्शन योजनेची मागणी करण्यात आली आहे. 18 डिसेंबर 2017 ला नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनात 50,000 कर्मचार्‍यांसह संघटनेतर्फे मुंडन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचार्‍यांना सेवा व मृत्यू उपदान तसेच कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ तत्काळ देऊ आणि सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्‍वासन दिले. तीन महिने उलटून तरी शासन निर्णय घेत नाही. आजपर्यंत सतत आश्‍वासनाव्यतिरिक्त कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे आता घंटानाद आंदोलन करून आश्‍वासनाची जाणीव कर्मचार्‍यांनी करून दिली. 

23 ऑक्टोबर 2017 ला शिक्षकांसाठी वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काढला. त्यात अन्यायकारक अटी टाकून वरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षकांकडून हिरावून घेतली. त्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शाळा प्रगत केल्यास किंवा अ श्रेणीत आणल्यास अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता किंवा वेतनवाढ देऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे. शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद करावा लागत असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
या आंदोलनात पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम मोरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पंडित, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, चंद्रकांत पावसकर सहभागी झाले होते.