Wed, Jan 22, 2020 01:01होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 9:18PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील काँग्रेस भुवन येथील शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाच्या  सलूनची अज्ञातांनी तोडफोड करत मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तिघांची नावे पुढे आली असून पोलिसांनी बुधवारी 10 ते 12 जणांवर पूर्वनियोजित कटाचा गुन्हा दाखल केला आहे. अमित देसाई (रा.हातखंबा, रत्नागिरी), अमेय आणि नित्यानंद दळवी (रा..खालची आळी, रत्नागिरी ) व इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी मराठा मैदान येथे एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीकृष्ण ऊर्फ बावा चव्हाण व शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते अमित देसाई यांनी मोबाईलवर  जैतापूर  प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे आमदार उदय सामंत पालकमंत्री असतानाचा जुना व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने दाखवला होता.त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळी अमित देसाई व बावा चव्हाण यांच्यात झटापट झाली होती. या रागातून या तिघांनी संगनमताने मंगळवारी रात्री अन्य 10 ते 12 जणांच्या मदतीने बावा चव्हाण यांच्या सलूनमध्ये घुसून त्यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्‍कयांनी मारहाण केली.त्यानंतर त्यांच्या गल्ल्यातील रोख 10 हजार, गळयातील सोन्याची चेन आणि त्यांचा मोबाईल हिसकावून ते पसार झाले होते. 

या घटनेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे आ. राजन साळवी, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. या मारहाणीची तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दोन पक्षांत उफाळलेला वाद अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरुन या तिघांसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वराळे करत आहेत.