होमपेज › Konkan › ‘ओखी’ प्रभावित भागाची नारायण राणेंकडून पाहणी

‘ओखी’ प्रभावित भागाची नारायण राणेंकडून पाहणी

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 10:01PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नुकसान पोहचलेल्या देवबाग, दांडी मालवण किनार्‍याची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान आपतग्रस्त मच्छीमारांनी नुकसानीची माहिती दिल्यानंतर शासनस्तरावर सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही श्री राणे यांनी दिली. त्यांच्या समवेत माजी खा. नीलेश राणे  होते. 
 नारायण राणे यांनी गुरुवारी सायंकाळी देवबाग येथे भेट देत समुद्राच्या लाटांनी उद्ध्वस्त  बंधार्‍यांची पाहणी केली. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, बाळू कोळंबकर, संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, ममता वराडकर, मोहन वराडकर, महेश जावकर,  आबा हडकर,राजू बिडये, अशोक तोडणकर, सहदेव बापर्डेकर, राजू परुळेकर, संजय लुडबे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी हालेस डिसोझा यांनी समुद्राच्या लाटांनी बंधारा उद्ध्वस्त केल्याने लाटा वस्तीत घुसत आहेत. या बंधार्‍याची उंची वाढविणे गरजेचे आहे, असे सांगितले.  तुम्ही आमदार असताना जो बंधारा झाला, त्या बंधार्‍यानंतर डागडुजी झाली नाही. आ. वैभव नाईक हे  या भागात फिरकले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी राणे यांनी बंधार्‍याबाबत आपण शासन स्तरावर प्रयत्न करू, अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

राणे यांनी दांडी येथील नारायण तोडणकर रापण संघ व कुबल रापण संघांना भेटी दिल्या. यावेळी कुबल रापण संघाच्या नुकसानग्रस्त होड्यांची पाहणी त्यांनी केली. याचवेळी मेस्त रापण संघाच्या प्रतिनिधीनी राणे यांची भेट घेत दोन महिन्यांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जाळ्यांची माहिती देत चार लाख रुपयांचे नुकसान होऊनही शासन स्तरावर अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सांगितले.