Mon, Jul 22, 2019 13:20होमपेज › Konkan › ओबीसी आरक्षणाला धक्‍का लागल्यास महाराष्ट्र पेटवू! : नवीनचंद्र बांदिवडेकर

ओबीसी आरक्षणाला धक्‍का लागल्यास महाराष्ट्र पेटवू! : नवीनचंद्र बांदिवडेकर

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 22 2018 9:02PMकुडाळ ः प्रतिनिधी

शासनाने मेगाभरती थांबवून ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. आता ही मेगाभरती सुरू करायला शासनाला भाग पाडू. त्याच बरोबर अन्य समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र पेटवू , असा इशारा भंडारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दिला.

कुडाळ शासकीय विश्रामगृहावर नुकतीच आरक्षित समाज संघटनेची बैठक झाली. या बैठकीत ते  बोलत होते.  सुतार समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री,  जिल्हा भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, वैश्यवानी जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, जिल्हा सचिव राजू गवंडे, कुडाळ तालुका अध्यक्ष एकनाथ टेमकर, हुमरस सरपंच अनूप नाईक, बौध्द महासंघाचे महेश परूळेकर, वेंगुर्ले तालुका भंडारी समाज अध्यक्ष रूपेश पावसकर, देवगड तालुका भंडारी समाज अध्यक्ष हेमंत करंगुटकर, प्रशांत तेंडोलकर उपस्थित होते. श्री बांदिवडेकर म्हणाले मराठा आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही.

मात्र, या आरक्षणाचा प्रश्‍न पुढे करुन राज्यातील मेगा नोकरभरतीला स्थगिती दिली हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. एकतर गेली अनेक वर्षे भरती प्रक्रीया टप्प होती. परिणामी बेकारी वाढत होती. आता या मेगा भरतीमुळे संधी उपलब्ध झाली होती  परंतु भरतीला स्थगिती मिळाल्यामुळे बेकार तरूणांच्या पोटावर पाय आला आहे. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाज पेटून उठला असून गणेश चतुर्थीनंतर आंदोलनाची रूपरेषा ठरविली जाईल. गेली कित्येक वर्षे सत्‍तास्थानी असलेल्या मराठा समाज आरक्षणापासुन वंचीत राहीला याबाबत आमचे दुमत नाही. शासनाने मेगा भरती स्थगिती न उठवल्यास ओबीसी बांधवांची मोठी आंदोलने सुरू होतील, ही आंदोलने मुख्यमंत्र्याच्या बंगल्यापासून सुरू होतील, असा इशारा श्री. बांदिवडेकर यांनी दिला असल्याची माहिती अतुल बंगे यांनी दिली. 

कुडाळात होणार कार्यशाळा 

शासनाने मेगा भरतीला स्थगिती देवून ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. त्यामुळे आता यापुढे ओबीसी बांधवांना संघटित होणे आवश्यक आहे. लवकरच कुडाळ येथे हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाज बांधवांची कार्यशाळा आयोजित केली जाईल, असे  श्री. बांदिवडेकर यांनी सांगितले.