Fri, May 24, 2019 08:35होमपेज › Konkan › आता वीजबिल मिळणार ई-मेल, कुरिअर,व्हॉटसअ‍ॅपद्वारे

आता वीजबिल मिळणार ई-मेल, कुरिअर,व्हॉटसअ‍ॅपद्वारे

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:12PMकुडाळ : वार्ताहर

वीज देयकामध्ये निर्माण होणार्‍या समस्या आणि त्याचा महसुलावर होणारा परिणाम यावर मात करण्यासाठी आता महावितरण कंपनीने केंद्रीय ई-बिलिंग प्रणाली अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीमुळे एकाचवेळी वीजदेयके, ई-मेल, व्हॉटसअ‍ॅप, कुरिअरच्या माध्यामातून वितरीत केली जाणार असून याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रोखर पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात 3 लाख 6 हजार ग्राहक असून एकूण वसुलीपैकी सद्यस्थितीत 42 हजार 500 ग्राहकांकडून ऑनलाईन पद्धतीने देयके भरली जात आहेत. इतर ग्राहकांसाठी देयके अचूक होण्यासाठी वेळेवर रिडींग घेणे, देयके वेळेत तयार करणे ती ग्राहकांपर्यत वेळेत पोहचवणे, त्यातील चुका कमी करणे या समस्यांसाठी महावितरणाने हे पाऊल उचलले आहे. या समस्यांचा परिणाम महसुलावर होत असल्याने नव्याने कार्यान्वित केलेल्या प्रणालीत दोष कमी होणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले आहे. वीज मीटरचे रीडिंग फोटोद्वारे घेण्यासाठी स्थानिक स्तरावर ठेकेदाराची नियुक्‍ती करण्यात आली आहे. रीडिंग घेतल्यावर जिल्हास्तरावरील कार्यालयामधील संगणकावर माहिती पाठवून त्यानंतर देयके तयार केली जातात.

यासाठी ग्रामीण भागासाठी 8.50 रू. तर शहरी भागासाठी 6.50 रू. वितरणासाठी बिलामागे दिले जात आहेत. आता ही माहिती महावितरणच्या मुंबईतील मुख्य कार्यालयात पाठवली जाणार आहे. त्यामुळे रिडींग नंतर देयके तयार करणे व त्यातील दुरूस्ती थेट मुंबई कार्यालयातून होणार आहे. त्यानंतर देयके ठेकेदारांमार्फत वितरण करण्याऐवजी ती कुरिअर सेवेद्वारे प्रत्येक ग्राहकाच्या पत्त्यावर पाठवली जाणार आहेत. सद्यस्थितीत देयक छपाई करून दिले जाणार असले तरी येत्या कालावधीत हेच देयक मोबाईल व मेलवरच पाठवले जाणार असल्याची माहिती  श्री. पाटील यांनी दिली आहे. ग्राहकांना वेळेत देयके मिळतील, ते भरण्यासाठी विलंब होवू नये यासाठी सर्वत्र ही केंद्रीय ई बिल प्रणाली सुरू करण्यात आली. भविष्यात मोबाईल अ‍ॅपच्या वापरावर लक्ष केंद्रीत करून ती ई-मेल व व्हॉटसअ‍ॅपद्वारे पाठविण्यावरच विशेष भर दिला जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महावितरणच्या मुंबईतील कार्यालयात दर दिवशीची माहिती घेण्यात येणार असून दरमहा निश्‍चित तारखेलाच ग्राहकांच्या मीटर रीडिंगचे फोटो घेतले जाणार आहेत. यापुढे 1 ते 25 तारखेपर्यत मीटर रिंडीग पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंद केल्यावर रिडींग, देयक तयार झाल्याची सूचना, देयक भरण्याची तारीख अशा सर्व सूचना एसएमएसद्वारे ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 6 हजार ग्राहकांपैकी 2 लाख 33 हजार 820 ग्राहकांचे मोबाईल नंबर जिल्हा महावितरणकडे प्राप्त झाले आहेत. विजबिलावर नोंदवण्यासाठी उर्वरीत ग्राहकांनी नजीकच्या महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात द्यावेत.