Wed, Jan 22, 2020 14:54होमपेज › Konkan › आता खेडोपाडीही मिळणार पोस्टाची बँकिंग सुविधा!

आता खेडोपाडीही मिळणार पोस्टाची बँकिंग सुविधा!

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:30PMकणकवली : अजित सावंत

देशभरात खेडोपाडी पोस्ट खात्याची सेवा आहे. त्याच धर्तीवर आता खेडोपाडी पोस्ट खात्याची बँकिंंग सुविधाही ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध होणार आहे. ‘इंडिया पोस्ट पेमेंट डिजिटल बँक’ या नावाने ही बँक सुरू होणार असून प्रत्येक जिल्ह्यात या बँकेची शाखा असणार आहे. देशभरात अशा 650 तर महाराष्ट्रात 40 शाखा असणार आहेत. या बँकेचे येत्या  उद्घाटन 21 ऑगस्ट रोजी होणार होते. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभरात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आल्याचे डाकघर अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले. सिंधुदुर्गसाठी मालवण पोस्ट कार्यालयात या बँकेची जिल्हा शाखा सुरू होणार आहे. त्याचबरोबर जामसंडे, कुणकेश्‍वर, इळये, कट्टा येथील पोस्टांमध्ये या बँकेचे एक्सटेंन्शन काऊंटरही याच दिवशी सुरू होणार असून येत्या डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्वच पोस्टमध्ये ही सेवा सुरू होईल अशी माहिती सुत्रांनी दिली. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला आजही बँकींग सुविधांसाठी शहरांच्या ठिकाणी जावे लागते. त्यांना जर त्यांच्या गावातच ही सुविधा उपलब्ध झाली तर त्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. शिवाय बँकींगच्या अनेक चांगल्या सुविधा ग्रामीण जनतेला उपलब्ध होणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट डिजिटल बँक, मोबाईल फोनच्या सुविधेपासून अकाऊंटला अ‍ॅक्सेस करण्यासाठी मोबाईल एक्सचेंजद्वारे अत्याधुनिक सोपी सुरक्षित आणि वापरण्यास सुलभ मोबाईल बँकीग सेवा देणार आहे. ऑनलाईन पेमेंट, पेमेंट ट्रान्सफर अशा अनेक  ई-बँकींग सुविधा यामध्ये असणार आहेत. या बँकेत शून्य आरंभिक बचत खाते उघडता येणार आहे. तसेच बचत आणि चालू खात्यांवर ठेवी ठेवता येणार आहेत. तसेच डिजिटल स्वरूपातील सक्षम देयके, विमा आणि व्यक्ती यांच्या दरम्यान सर्व प्रकारची सेवा तसेच तृतीय पक्ष आर्थिक सेवा जसे की विमा, म्युच्युअल फंड, विम्या कंपन्या, म्युच्युअल फंड हाऊसेस, पेन्शन सुविधा, आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण इ. सह भागिदारी करताना पेन्शन, क्रेडिट उत्पादने अशा सुविधा उपलब्ध करून देणार आहे. देशाच्या सर्वदूर भागात जनतेला बँकिंंग सुविधा उपलब्ध करत त्यांना जोडणे हा या बँकेच्या स्थापनेमागचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. 

केंद्र सरकारच्या सामान्य जनतेसाठी अनेक योजना आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा योजनांमधील पेमेंट हे या बँकींगद्वारे घरपोच लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आधारकार्डच्या माहितीद्वारे खेड्यापाड्यातील लोकांना त्यांच्या दारातच या बँकींगद्वारे खाते उघडण्याची िआ पेमेंट घेण्याचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. 

मालवण पोस्ट कार्यालयात या बँकेची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा सुरू होणार असून जिल्ह्यातील इतर पोस्ट कार्यालयांमध्ये या बँकेचे काऊंटर सुरू होणार आहे. या काऊंटरवरून लोकांना बँकिंग सुविधा दिली जाणार आहे. 21 रोजी दिल्लीत पंतप्रधांनांच्या हस्ते तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन होणार आहे. तर सिंधुदुर्गातही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या बँकेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती देण्यात आली.