Mon, Aug 19, 2019 12:04होमपेज › Konkan › आता जिल्ह्यात ‘गाव तिथे पोलिस मैत्रीण’

आता जिल्ह्यात ‘गाव तिथे पोलिस मैत्रीण’

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:58PMखेड : प्रतिनिधी

सुकिवलीतील अत्याचार व खून प्रकरणी सखोल तपास केला जाईल. हे कृत्य करणार्‍यास कठोर शिक्षेसाठी प्रयत्न राहील, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ‘गाव तिथे पोलिस मैत्रीण’ संकल्पना खात्याच्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

सोमवारी घट्टे यांनी सुकिवली येथे बलात्कारानंतर खून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच घटनास्थळाची पाहणी करून पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांना सूचना केल्या. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अशा घटना घडू नयेत, ही जबाबदारी पोलिसांइतकीच तेथील ग्रामस्थांचीदेखील असते. 

अशा वाईट प्रवृत्तीच्या  लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. विशेष महिला आणि मुलींबाबतच्या तक्रारी गावपातळीवर मिटवू नयेत. अशा प्रकारांबाबत कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असून अशा घटनांची माहिती गावपातळीवर न मिटवता थेट पोलिस ठाण्यात द्यावी. असा प्रकार करणार्‍या व्यक्‍तींना शिक्षाच झाली पाहिजे, या साठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.  एक-दोन प्रकार पचल्यानंतर संबंधित गुन्हेगार भविष्यात एखादा मोठा गुन्हा करतो. अशी अनेक उदाहरणे समाजात घडत आहेत. नराधम सूर्यकांत चव्हाण याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मात्र, ते गावपातळीपर्यंतच मर्यादित राहिले. म्हणूनच त्याचे मनोबल वाढले. त्याचवेळी त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती तर पुन्हा मोठा गुन्हा करायला धजावला नसता. यापुढे संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्या बाबतीत ज्या तक्रारी असतील त्या गावपातळीवर न मिटवता थेट पोलिस ठाण्यात येतील, असे घट्टे यांनी सांगितले.

महाविद्यालयातही पोलिस मैत्रीण

महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार त्यांचे लैंगिक शोषण त्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात पोस्को संदर्भातले गुन्हे वाढत आहेत. असा एखादा प्रकार घडल्यास थेट पोलिसांशी पीडित महिलेस संपर्क करता यावा, यासाठी ‘पोलिस मैत्रीण’ हे माध्यम असेल. तसेच गाव तेथे पोलिस मैत्रीण व महाविद्यालयांमध्येही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. पोलिस मैत्रिणीने अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती थेट वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे द्यावी. त्यासंदर्भात सखोल तपास करून गैरकृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही घट्टे यांनी सांगितले.