Thu, Apr 25, 2019 13:59होमपेज › Konkan › ‘एनएचएम’चा नाशिक ते मुंबई लाँग मार्च

‘एनएचएम’चा नाशिक ते मुंबई लाँग मार्च

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:31PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचारी यांच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी दि. 18  मेपासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढून मुंबईतील आझाद मैदान येथे 24 मेपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाने (एनएचएम) दिला आहे. या लाँगमार्चमध्ये रत्नागिरीतील 200 कर्मचारी सहभागी होणार  आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना सरकारी सेवेमध्ये कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी संघटनेने 11 ते 21 एप्रिल असे सलग 10 दिवस कामबंद आंदोलन केले होते.

संघटनेच्या या ठाम भूमिकेमुळे 21 एप्रिल रोजी आरोग्य मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करण्याचे मान्य केले होते. बैठकीनंतर पुढील 10 दिवसांमध्ये संघटनेच्या विविध मागण्यांबाबत त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सरकारी निर्णय काढण्यात येईल, प्रथम सभा घेऊन त्या सभेमध्ये कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्या समायोजनेच्या द‍ृष्टीने आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागातील पुढील पदभरती थांबवण्याबाबतचा निर्णय 10 दिवसांत घेण्यात येईल, समिती स्थापनेपासून तीन महिन्यांच्या कालावधीत ‘एनएचएम’अंतर्गत सर्व कर्मचारी यांचे समायोजन करण्यात येईल, असे आरोग्य मंत्र्यांनी मान्य केले होते. त्याचप्रमाणे आरोग्य मंत्र्यांसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयानुसार आणि मंजूर केलेल्या मागण्यांबाबत त्वरित पत्रक काढण्यात येईल, असे आश्‍वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले होते.

सरकारने दिलेल्या आश्‍वासनापैकी फक्‍त महिलांची बाळंतपणातील रजा सहा महिन्यांची करण्याचे परिपत्रक काढले तेवढीच जमेची बाजू आहे. बाकीची आश्‍वासने हवेत विरून गेली आहेत. सरकारने तातडीने त्रिस्तरीय समितीची स्थापना करण्याबाबतचा सरकारी निर्णय काढावा, त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करावे, आरोग्य विभाग, ग्रामविभागातील भरती थांबवण्यात यावी, तसेच विविध बैठकांमधील निर्णयाचे सरकारी निर्णय काढावेत, अन्यथा 18 मेपासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च आणि 24 मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यावर संघटना ठाम असल्याचे राज्य संघटनेचे विभागीय सदस्य राकेश तोडणकर यांनी सांगितले.