Mon, Jul 22, 2019 05:34होमपेज › Konkan › बांधकामासाठी आता मलेशियन वाळू

बांधकामासाठी आता मलेशियन वाळू

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 11:01PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

वाळू उपशाने किनार्‍यांची होणारी धूप आणि अवैधरित्या वाळू  उपशाने वाळूची भेडसावणारी चणचण लक्षात घेता आता मलेशियन वाळू आयात करण्यात येणार आहे. तसेच शासकीय बांधकामांसाठी लागणारा वाळू साठा आरक्षित करण्यात येणार आहे, अशी माहिती येथील खनिकर्म विभागाने दिली. यासाठी कोकणातील वाळू उपशाचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात येणार आहे.

कोकणात खाडी किनार्‍यावर आणि सागरी किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करण्यात येतो. यासाठी हातपाटीला परवानगी देण्यात आली असताना काही वाळू व्यावसायिक यांत्रिक उपसा करून  वाळूचा अनिर्बंध उपसा करतात. त्यामुळे किनार्‍यांची धूप होऊन अनेक किनारे धोकादायक झाले आहेत. वाळूूवरील निर्बंधामुळे कोकणातच वाळूची चणचण भासू लागली असताना आता नव्याने या उपशाबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. तर बांधकामासाठी लागणारी वाळू कृत्रिमरित्या तयार करण्याचा पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे.

कोकणात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना जिल्हा प्रशासनाने अनेक भागात चेकपोस्टद्वारे वॉच ठेवला आहे. अलीकडेच अवैध वाळू उपसाशावर प्रशासनानेही कारवाईही केली. तरीही वाळूची कमतरता भासत असून आता शासकीय बांधकामे वाळूशिवाय थांबून राहू नयेत याकरिता स्वतंत्र साठा ठेवण्यात येणार असून हाच नियम सहकारी संस्थांच्या कामांनाही लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याने या संदर्भात काही निर्बंध घातले असून वाहत्या पाण्यात यंत्राच्या सहाय्याने वाळू उपसा न करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. 

वाळूला पर्याय शोधण्याची गरज असून दगडाचा चुरा करून तो वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मलेशिया येथे मोठ्या प्रमाणावर समुद्र किनारे आहेत. तेथे वाळू उपशासंदर्भात फारसे निर्बंध नाहीत. त्यामुळे मलेशियाहून वाळू आयात करण्याचा प्रस्ताव आहे. नदी आणि किनार्‍यांची धूप थांबवण्यासाठी वाळूला पर्याय शोधण्याची आवश्यकता असल्याने कृत्रिम वाळू आणि मलेशियन वाळूची आयात या दोन पर्यायांचा आता प्रसार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची एक कार्यशाळा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.