Wed, May 22, 2019 06:39होमपेज › Konkan › कोकणातील लोकसंस्कृती आता ऑनलाईन

कोकणातील लोकसंस्कृती आता ऑनलाईन

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 11:57PM रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणातील लोकसंस्कृती जपणार्‍या तसेच शेती, निसर्ग, साहसी क्रीडा, ऐतिहासिक वारसा, कला-हस्तकला- पाककला, जंगले तसेच पर्यावरण, परंपरा व जीवनशैली या विविध क्षेत्रांतील खासगी उपक्रमांना प्रोत्साहन देताना त्याचा उपयोग पर्यटन वाढीसाठी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अशा संस्थांसाठी ‘महाभ्रमण’ योजना राबवून पाठबळ दिले आहे. या योजनेत जिल्ह्यातील 7 गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे.
कोकणात विविध माध्यमातून लोकसंस्कृती  आणि कलांचे सवर्धन करण्यात येते.

कोकणात येणार्‍या देशी आणि विदेशी पर्यटकांना अशा लोकसंस्कृतीचे आणि पारंपरिक कलांचे जवळून दर्शन व्हावे आणि त्यामध्ये सहभागी होता यावे, यासाठी  अशा कला संस्थांचे आणि मंडळाची माहिती आणि त्यांचे उपक्रम ‘एमटीडीसी’ने आपल्या संकेतस्थळावर समाविष्ट केले आहेत. यामध्ये कोकणातील नमन, दशावतार यासह शिमगोत्सव, पालखी उत्सव, पारंपरिक व्यवसाय यामध्ये मत्स्य, कृषी या क्षेत्रात चालणारे पारंपरिक कला, गड किल्ल्यांवरील कार्यक्रम,  कलाकृती, कातळशिल्पांची गावे यांचा समावेश आहे. या कला ज्या गावात जोपासल्या जातात अशा गावांमध्ये महाभ्रमण ही योजना राबविण्यात येणार आहे.

या गावातील कला संकेतस्थळाच्या माध्यमातून पर्यटकांना त्याची माहिती आणि तेथील सुविधा याबाबत ‘एमटीडीसी’ने संकेतस्थळावर दिली आहे. यासाठी सहा गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. यामध्ये कोकणची लोकसंस्कृती जपणार्‍या तसेच शेती, निसर्ग, साहसी क्रीडा, ऐतिहासिक वारसा, कला-हस्तकला- पाककला, जंगले व पर्यावरण, परंपरा व जीवनशैली या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना त्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात या उपक्रमात  खोपी (ता. खेड), परशुराम (ता.चिपळूण), तुरळ (ता. संगमेश्‍वर), बुरंबी (ता. संगमेश्‍वर), देवरुख (ता. संगमेश्‍वर) व तामणमळा (ता. चिपळूण),  मंडणगड  या   गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात ‘एमटीडीसी’तर्फे या  उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांसाठी निवास न्याहारी व्यवस्था केंद्रे, पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी मार्गदर्शक, तसेच तेथील प्रवासी सुविधा देण्यात येेणार आहे. त्यासाठी करावे लागणारे आरक्षणही ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Tag : Konkan, Kokan Culture, Online, digital world