Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Konkan › कणकवलीतील बांधकामे हटविण्यासाठी नोटिसा

कणकवलीतील बांधकामे हटविण्यासाठी नोटिसा

Published On: Aug 17 2018 10:34PM | Last Updated: Aug 17 2018 10:04PMकणकवली : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरातील बहुतांशी प्रकल्पग्रस्तांनी अद्यापही शासनाकडून मोबदल्याची रक्‍कम स्वीकारलेली नाही. तरी ज्यांनी ही रक्‍कम स्वीकारली आहे अशा प्रकल्पग्रस्तांना महामार्ग प्राधिकरणतर्फे चौपदरीकरण भूसंपादनावरील बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. भूसंपादन झालेली जमीन व त्यावरील बांधकाम 23 ऑगस्टपूर्वी रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्यांनी अद्यापही मोबदला स्वीकारलेला नाही त्यांच्याबाबत या नोटिसांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. 

कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला ग्रामीण निकषानुसार दोन गुणांकाप्रमाणे चौपट भरपाई देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्याबाबतचा निर्णय अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्यातच अलीकडे काही दिवसांपूर्वी शहरातील प्रकल्पग्रस्तांनी कणकवली शहरामध्ये उड्डाणपूल होत असल्याने या पुलाच्या बिमच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेतेरा मीटर जागा रस्त्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याच्या बाहेर आणखी सहा मीटरचे सर्व्हिस रोड नको. हे सर्व्हिस रोड झाल्यास शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. व्यापार्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व्हिस रोड रद्द करावेत, अशी मागणी केली आहे.  त्याबाबत शासन कोणता निर्णय घेते याची उत्सुकता आहे.

दरम्यान, कणकवलीतील ज्या प्रकल्पग्रस्तांनी मोबादला स्वीकारला आहे त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सावंतवाडी उपविभागीय अधिकार्‍यांनी भूसंपादन जमिनीवरील बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. भूसंपादन झालेल्या जागेतील बांधकाम (घर, पडवी, आवार, भिंत) हे 23 ऑगस्ट रोजी स. 10 वा. पाडण्यात येणार आहे.