Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Konkan › स्मशानभूमी नव्हे...हे तर मानव मंदिर

स्मशानभूमी नव्हे...हे तर मानव मंदिर

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 30 2018 11:02PMरत्नागिरी : राजेश चव्हाण

मृत्यू हे शाश्‍वत सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. मृत्यूनंतर हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्काराला विशेष महत्त्व आहे.  हे महत्त्व लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांच्या संकल्पनेतून स्मशानभूमीचे रूपच पालटले असून, या परिसराला राजघाटासारखे स्वरूप प्राप्‍त झाले आहे. निरुळवासीयांचे हे  मानव मंदिर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांना प्रेरणादायी ठरणारे आहे.

ग्रामीण भागातील स्मशानशेडची अवस्था पाहिल्यावर लोकप्रतिनिधींच्या कामाबद्दल मृत व्यक्‍तीचे आप्‍तेष्ट संतप्त प्रतिक्रिया देतात. मात्र निरूळमधील आगळी-वेगळी स्मशानभूमी म्हणजे मानव मंदिर सर्वांच्याच विचाराला तडा देणारी आहे.

जि. प. सदस्य उदय बने यांचे निरूळ हे गाव. सध्या करबुडे गटामधून उदय बने हे जि. प. सदस्य म्हणून निवडून आले आहेत. चार ते पाच वर्षांपासून निरूळमधील या स्मशानभूमीचा कायापालट सुरू आहे. याबाबत बोलताना उदय बने यांनी सांगितले की, ही स्मशानभूमी नदीकाठी जंगलात होती. अंत्ययात्रा काट्याकुट्यातून न्यावी लागत होती. विधी होईपर्यंत मृतदेह तात्पुरत्या साफसफाई केलेल्या जागेत ठेवावा लागत असे. ही घटना नातेवाईकांसह सर्वांच्याच मनाला वेदनादायी असे. ग्रामीण भागातील अंधश्रद्धांमुळे या ठिकाणी येण्याचेही ग्रामस्थ टाळत असत. ही परिस्थिती बदलण्यासाठीच उदय बने यांनी पुढाकार घेतला व ग्रामस्थांनीही त्यांना साथ दिली. 

नदीकाठावर असलेली ही स्मशानभूमी दर पावसाळ्यात वाहून जात असे. यातून मार्ग काढण्याचे बने यांनी ठरवले. त्यानुसार नियोजन करण्यात आले. त्यासाठी साडेतीनशे फूट लांबीची भक्‍कम संरक्षक भिंत उभारण्यात आली. आता त्यावर किल्ल्यासारखी तटबंदी बांधण्यात आली आहे.

तटबंदीच्या आत स्मशानशेड, लाईट व पाण्याची व्यवस्था, रक्षा विसर्जनासाठी अग्‍नीकुंड, विधीपूर्वी आंघोळीसाठी नळ व शॉवर, नातेवाईक, ग्रामस्थ व नातेवाईकांना बसण्यासाठी स्टेडियमसारखी गॅलरी, टॉयलेट-बाथरूमची सुविधा, शोकसभेसाठी व्यवस्था, त्याचप्रमाणे विधीसाठी लागणार्‍या तुळशी, माका व अन्य झाडांची लागवडही करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे वाहने पार्किंगची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे. शोकसभेसाठीही याच परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मानव मंदिराचे कामही पूर्ण झाले आहे. सर्व जातीधर्मांसाठी हे मानव मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. या मानव मंदिराच्या साफसफाईचे व्यवस्थापन उदय बने यांनी  स्वत:कडे ठेवले आहे.

नियमित स्वच्छता व येथील परिसर पाहिल्यानंतर नातेवाईकांच्या अंतिम दर्शनासाठी येणार्‍यांच्या मनाला शांती मिळेल, असेच हे निरूळ येथील  हे मानव मंदिर आहे. या कामाची पाहणी  करण्यासाठी अनेकजण या ठिकाणाला भेट देत आहेत.