Wed, Apr 24, 2019 22:16होमपेज › Konkan › विमानाचे श्रेय कोणी घेऊ नये

विमानाचे श्रेय कोणी घेऊ नये

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:33PMखेड : प्रतिनिधी

खेड शहरात वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी प्रयत्न करून संरक्षण विभागाकडून मिळविलेल्या विमानाचे श्रेय घेण्याचा व त्यामागे लपून राजकारण करण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. परंतु, संरक्षण राज्यमंत्री यांच्या पत्रामुळे त्यांच्या बनाव उघड झाला आहे. जे स्वतः काही करू शकले नाहीत त्यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला युवा सेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम यांनी लगावला.

रविवार दि. 24 रोजी सायंकाळी शहरातील योगीता दंत महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरात वीर स्मारकासाठी संरक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या विमानावरून रंगलेल्या वादाबाबत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, खेडच्या विकासासाठी व येथे उभ्या राहत असलेल्या विविध प्रकल्पांसाठी शिवसेना पूर्ण ताकतीनिशी प्रयत्न करत आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम, अनंत गीते, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नांमुळेच शहरासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 

प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील सैनिकी स्मारकासाठी संरक्षण विभागाकडून  विमान व रणगाडा मिळावा यासाठी पालिकेमार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा रामदासभाई कदम यांनीच केला आहे. परंतु, काही जणांनी या प्रकरणाला वेगळे वळण लावून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. संरक्षण विभागाकडून प्राप्त झालेले विमान योगीता दंत महाविद्यालयाच्या परिसरात संरक्षण विभागासोबत सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सुरक्षित ठेवण्यात आले आहे. दि.1 जुलैपर्यंत विमान प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसविण्यासाठी आवश्यक पायाभूत गोष्टींची पूर्तता करण्यात येईल.

त्यानंतर आचारसंहिता संपताच लवकरात लवकर सन्मानपूर्वक विमान उद्यानात बसविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. खेड शहरात कोकणातील अग्रेसर योगीता दंत महाविद्यालयाची उभारणी ना. रामदास कदम  यांनी केली. शहरातील खांबतळे पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे, यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शहरातील रस्त्यांसोबतच इतर अनेक कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. परंतु, खोडसाळपणे शहरातील जनतेने नाकारलेले काही लोक विकासाच्या शिवसेनेच्या प्रयत्नांचे श्रेय घेऊ पाहत आहेत.

स्वतः कित्येक वर्ष समाजकारणात वावरूनही विकासात्मक एकही काम करू न शकलेल्यांना हे शोभत नाही. रामदास कदम यांनी शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने विकासाला चालना मिळेल अशी अनेक कामे केली आहेत. श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी कोणती कामे केली असा सवाल करत जनता सूज्ञ असून बालीशपणाचा चाललेला खेळ आता विरोधकांनी थांबवावा, असे कदम म्हणाले.