Mon, Jun 24, 2019 21:58होमपेज › Konkan › कोयनेच्या वीजनिर्मितीचे नो टेन्शन

कोयनेच्या वीजनिर्मितीचे नो टेन्शन

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात अपेक्षित पाऊस झाल्याने अनेक प्रश्‍न आपोआपच मिटले होते. चालूवर्षीही वेळेत व सरासरी एवढा पाऊस पडेल अशा आशा हवामान खात्याने वर्तवल्या आहेत. याशिवाय वर्षारंभाला असणारा सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता जून, जुलै महिन्यांत पाण्याअभावी सिंचन अथवा वीजनिर्मितीला कोणतीही अडचण येणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष आता संपले. जुन्या वर्षाला निरोप व नव्या तांत्रिक वर्षाच्या सुरुवातीला धरणात सध्या तब्बल 29.88 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा तब्बल अकरा टीएमसी ज्यादा पाणीसाठा शिल्लक असल्याने यानंतर जून, जुलै महिन्यांत पावसाने दगाफटका केला तरीही हा साठा पुरेसा ठरणार आहे. चालूवर्षी अखंडित वीज व सिंचनासाठी महत्त्वपूर्ण व कायदा (लवाद) याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत जलसंपदा व वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद ठरले आहेत. 

गतवर्षी 1 जूनला 19.08 टीएमसी पाण्यावर या धरणाचा तांत्रिक प्रवास सुरू झाला. चालू पावसाळ्यात येथे एकूण 126.09 टीएमसी पाण्याची आवक झाली. धरणाची साठवण क्षमता व आवक याचा मेळ घालण्यासाठी अतिवृष्टीच्या काळात येथून विनावापर 7.07 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले. तर वर्षभरात पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 67.56, सिंचनासाठी 29.70 पूरकाळात 2.48 असे एकूण 99.74 टीएमसीचा पाणीवापर होऊन त्यातून 3207.214 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग व बाष्पीभवनामुळे 7.93 टीएमसीपाणी वाया गेले आहे. 

105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणातील पाण्यावर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची सिंचनाची व विजेची गरज भागवली जाते. 

याशिवाय पूर्वेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील सिंचनाची गरजही भागवली जाते. वर्षभरासाठी या धरणात असणार्‍या एकूण पाण्यापैकी पाणी वाटप लवादानुसार येथे वीजनिर्मिती व सिंचनासाठी लागणार्‍या पाण्याचे नियोजन केले जाते. 

पूर्वेकडील पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यांतील 1920 मेगावॉट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वर्षभरासाठी 67.50 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. 
चालूवर्षी याचा काटेकोर व त्याचपटीत वापर झाला आहे. तर पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात येणार्‍या पाण्यावर धरण पायथा वीजगृहातून 40 मेगावॉट वीजनिर्मिती करून पुढे हे पाणी सोडण्यात येते. गत दोन वर्षांच्या तुलनेत चालूवर्षी सिंचनासाठी थोडा कमी पाणीवापर झाला आहे. यासाठी 29.70 टीएमसी पाणीवापर झाला आहे.