Mon, Jun 17, 2019 18:15होमपेज › Konkan › कोकणातील बीचवर ‘नो सेल्फी झोन’

कोकणातील बीचवर ‘नो सेल्फी झोन’

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 9:52PM
रत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

सागरी किनार्‍यावर (बीच) पिकनिकसाठी गेल्यानंतर सेल्फीचा अट्टाहास, पाण्यात खोलवर जाण्याचा अतिउत्साह यामुळे अनेकदा सागरी किनार्‍यावर दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुढाकार घेतला आहे. बीचवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये ‘नो सेल्फी झोन’चा अंतर्भाव करावा, सुरक्षा रक्षकांना स्वतंत्र अधिकार द्यावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. 

काही तरुणांचा वाढता उन्माद, जीव धोक्यात आहे हे माहीत असूनही सेल्फीचा अट्टहास यामुळे उत्साह जीवावर बेतण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. आजवर सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. यात तरुणांचा आकडा सर्वाधिक आहे. सेल्फीचे व्यसन हा स्मार्ट फोन वापरकर्त्यांना जडलेला आजार आहे. सेल्फीमुळे जीव जाण्याच्या घटना  पर्यटनस्थळी सर्वाधिक घडल्या आहेत. पर्यटनाला घराबाहेर पडणार्‍यांचा उत्साह, मद्यप्राशन व इतर गैरप्रकार यामुळे बहुतांश  वेळा अशा दुर्घटना घडतात. 

डहाणूमध्ये अलीकडेच एक दुर्घटना घडली होती. गेल्या महिन्यात रत्नागिरीत मालगुंड येथे पुुण्यातील एका पर्यटकाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला होता.  
कोकणातील बहुतांश समुद्रकिनार्‍यांवर पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता कोकणासह मुंबईतील किनार्‍यांवर सुरक्षित यंत्रणा सक्षम करण्याची गरज वारंवार दिसून येते आहे. पर्यटन स्थळांवर येणार्‍या मनमानी आणि उत्साही पर्यटकांसाठीही आता कडक नियमावली तयार करण्याची आणि पर्यावरण, सुरक्षा, प्रदूषण आदींना बाधा आणणार्‍या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वारंवार घडणार्‍या दुर्घटनांना आळा घालायचा असेल तर कडक शिस्तीसाठी पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी ‘एमटीडीसी’ने पुढाकार घेतला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांना स्वतंत्र अधिकार देण्यात यावे, तसेच  बीचवर असुरक्षित झोन उभारणीमध्ये ‘नो सेल्फी’ झोनचा समावेश करावा, अशी मागणी ‘एमटीडीसी’ने  प्रस्तावाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.