Thu, Jun 20, 2019 20:51होमपेज › Konkan › राजकीय नुकसान झाले तरी ‘रिफायनरी’होऊ देणार नाही!

राजकीय नुकसान झाले तरी ‘रिफायनरी’होऊ देणार नाही!

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 9:48PMकणकवली : प्रतिनिधी

गिर्ये, रामेश्‍वर तसेच राजापूर, नाणार परिसरात कोणत्याही परिस्थितीत ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी कितीही मोठे राजकीय नुकसान झाले तरी ते सहन करायला आम्ही तयार आहोत. शिवसेनेला खरोखरच प्रामाणिकपणे  हा प्रकल्प रद्द करायचा असता तर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांनी गिर्येत अलिकडेच झालेल्या सभेला उपस्थित राहून जनतेला हा प्रकल्प रद्द करत आहोत असे सांगणे आवश्यक होते. एकीकडे उद्योगमंत्री भूसंपादनासाठी नोटीसा काढत आहेत आणि दुसरीकडे खा. राऊत प्रकल्प विरोधाची भाषा करत आहेत. यातून शिवसेनेची भूमिका संशयास्पदच आहे, असा टोला  आ. नितेश राणे यांनी लगावला.

कणकवलीत पत्रकारांशी ते बोलत होते. आ. राणे म्हणाले, गिर्येतील सभेत खा. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य पुर्णपणे बेजबाबदारपणाचे आहे. रिफायनरी बाबत नारायण राणे भाजप अध्यक्षांना भेटले असे खा. राऊत यांचे म्हणणे असेल तर त्यांनी पुरावा द्यावा, मग आम्ही त्याचे स्पष्टीकरण देऊ. मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार्‍या खा. राऊत यांनी अद्यापपर्यंत हक्कभंग का आणला नाही. याचाच अर्थ मुख्यमंत्री जे बोलले ते खरे आहे. शिवसेनेच्या गिर्येतील सभेला संघर्ष समितीचे कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते, जनतेचाही प्रतिसाद नव्हता यावरून शिवसेनेबाबत जनतेच्या मनात आता विश्‍वास राहिला नाही, असा टोलाही आ. राणे यांनी लगावला. 

महामार्ग चौपदरीकरणाबाबत आ. नितेश राणे म्हणाले, जोपर्यंत कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम सुरू करू दिले जाणार नाही. वृध्दांनी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही दिली होती. आता तो प्रस्ताव काय होता, त्यावर शासनाने काय भूमिका घेतली आहे हे जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केल्यांनंतर स्पष्ट होईल. शासनाने लोकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यास लवकरात लवकर कणकवलीत महामार्गाचे काम सुरू होईल, असेही आ. राणे म्हणाले.