Sat, Apr 20, 2019 09:53होमपेज › Konkan › आमदार नितेश राणे यांचा आक्रमक पवित्रा

आमदार नितेश राणे यांचा आक्रमक पवित्रा

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 10:16PM

बुकमार्क करा
 

कणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना ग्रामीण निकषानुसार दोन गुणांकाने चौपट भरपाई मिळावी या व अन्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त वृध्दांनी बुधवारी सकाळपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला न आल्याने आणि फोनही न उचलल्याने आ. नितेश राणे यांनी  आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी कुडाळ प्रांतांच्या फोनवर संपर्क साधत जनेतपेक्षा अधिकारी  किंवा लोकप्रतिनिधी मोठे नाहीत, तुम्ही वृध्द उपोषणकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, तुम्ही तत्काळ कणकवलीत या अशी मागणी केली. स्वतः जिल्हाधिकार्‍यांची त्यांनी ओरोसला जाऊन भेटही घेतली. अखेर सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कणकवली तहसील कार्यालयात येऊन उपोषणकर्ते व अन्य प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. 

उशीरापर्यंत ही चर्चा सुरू होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही तहसीलदारांच्या दालनात सुरू असलेल्या चर्चेवेळी मज्जाव करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी  उपोषणकर्ते रामदास मांजरेकर, सुभाष काकडे, उदय वरवडेकर, जयेश  धुमाळे, अनिल शेट्ये, नितीन पटेल, श्री. ठाणेकर आदी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. रात्री 8.30 वा. ही चर्चा संपली. पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासन प्रशासन सकारात्मक आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या स्तरावरच्या मागण्या मार्गी लावल्या जातील. उर्वरित मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे सांगितल्याचे ते म्हणाले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी उपोषणकर्त्यांची उपोषण स्थळी भेट घेऊन  उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले आ. नितेश राणे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन वृध्दांनी उपोषण मागे घेतले. 

दरम्यान बुधवारी सायंकाळी 3.30 च्या सुमारास आ. नितेश राणे उपोषणकर्ते वृध्दांच्या भेटीला आले. त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकार्‍यांशी फोनवर ते संपर्क साधत होते. परंतू जिल्हाधिकारी मिटींगमध्ये असल्याने त्यांनी आमदारांचा फोन उचलला नाही. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी कणकवलीच्या प्रांताधिकारी रजेवर असल्याने कुडाळचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी यांना कणकवलीत पाठवले होते. सुर्यवंशी यांंच्या मोबाईलवर यावेळी जिल्हाधिकार्‍यांचा फोन आला. आ. नितेश राणे यांनी सुर्यवंशी यांना आपल्याला जिल्हाधिकार्‍यांशी बोलायचे असे सांगत त्यांच्या फोनवरून जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. तुम्ही उपोषणकर्त्यांच्या भेटीला का आला नाहीत अशी विचारणा केली. त्यावेळी आपण मिटींगमध्ये आहे. कुडाळच्या प्रांताधिकार्‍यांना पाठविले आहे. ते उपोषणकर्त्यांशी चर्चा करतील असे त्यांनी उत्तर दिले. मात्र, यावर आ. नितेश राणे यांचे समाधान झाले नाही. वृध्द उपोषणास बसले आहेत,  एखाद्याच्या प्राणावर बेतले तर तुम्ही काय करणार आहात, जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा तुम्हाला इतर प्रश्‍न मोठे वाटतात का? लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविले पाहिजेत, तुम्ही कणकवलीत येणार की नाही ते सांगा अशी विचारणा करत तुम्ही येत नसाल तर मी तिथे येतो, असे सांगत स्वतःच आ. नितेश राणे जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीला ओरोसला रवाना झाले. जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांनी कणकवलीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करा अशी विनंती केली.  त्यानंतरच जिल्हाधिकार्‍यांनी सायंकाळी कणकवलीत येण्याचे मान्य केले. मात्र, आ. नितेश राणेंच्या या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. 

सायंकाळी 7 ते 7.15 च्या सुमारास जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयात आले. त्यांनी तहसीलदारांच्या दालनात उपोषणकर्ते व प्रकल्पग्रस्त यांच्याशी चर्चा केली. उशिरापर्यंत ही चर्चा सुरू होती. तर  उपोषणकर्ते व इतर मंडळी उपोषणस्थळी बसली होती. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी आणि नागरीकांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पाठिंबा दिला. नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, सुशांत नाईक, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,  राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दादा कुडतरकर, गुरू काळसेकर, काँग्रेस शहर अध्यक्ष विलास कोरगावकर आदींसह अनेकांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. सायंकाळी उशिरा आ. नितेश राणे हे देखील पुन्हा उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले होते. कणकवलीचे पोलिस  निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.