Thu, Jun 20, 2019 00:59होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात डॉक्टर कधी देतलास?

सिंधुदुर्गात डॉक्टर कधी देतलास?

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 10:26PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

डॉक्टरांनुऽऽ  देवगडचो झिल आसानपण गावाकडच्या मानसाक इसरलास.. सिंधुदुर्गात लोक लेफ्टो, माकडतापान आणि अपघात होवन मरतत, उपचार करूक डॉक्टर नाय. ते कधी देतलास? आम्ही तीन वरसा झाली डॉक्टर देवा म्हणान आराडतवं, तुमका आयकाक कधी येतला? असा खास मालवणी भाषेत आ.नितेश राणे यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मराठी भाषेत प्रश्न विचारून तीन वर्षांत उत्तर मिळाले नाही, आता मालवणीत विचारल्यानंतर तरी ठोस आश्वासन द्या, अशी कोपरखळीही नितेश राणे यांनी लगावली. त्यांच्या मालवणी दणक्याने सभागृहात काही काळ हशा पिकला.

सिंधुदुर्ग जिल्हयातील ट्रॉमा केअरमध्ये डॉक्टर उपलब्ध होत नसल्याबाबतचा प्रश्न आ.नितेश राणे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, आपण मालवणीत प्रश्न विचारला. बरे वाटले. पण मी उत्तर मराठीतूनच देतो. सिंधुदुर्गसह राज्यातील डोंगरी भागात डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. डॉक्टरांची वेतनवाढ करण्याची आवश्यकता असून सध्या राज्यात जे विशेष तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना 70 हजार रुपये किमान वेतन आणि प्रती शस्त्रक्रिया चार हजार रुपये अशा पद्धतीने दीड लाख रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून त्यामध्ये न्युरोलॉजिस्ट, फिजिशियन, न्युरो सर्जन, रेडिओलॉजिस्ट यांची नेमणूक करुन ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. डॉक्टरांचे वेतन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सावंत यांनी सांगितले.