Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Konkan › पर्यटकांच्या स्वागतासाठी २६ किनारे सज्ज

पर्यटकांच्या स्वागतासाठी २६ किनारे सज्ज

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:37AMआरवली : वार्तहर

समुद्रकिनार्‍यांवर सुविधा पुरविताना पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानातून गेले काही महिने विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 26 किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सुविधा, सुरक्षा आणि रोजगार या तीन गोष्टींसाठी या किनार्‍यांवर पावणे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्टीत येणार्‍या पर्यटकांना निश्‍चितच किनार्‍यांवरील बदल भावणार आहेत.

सागरी मंडळामार्फत निर्मल सागर तट अभियान योजना जिल्ह्यातील 26 किनारी भागात राबविली जात आहे. या ग्रामपंचायतींना 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात चाळीस टक्के म्हणजे 1 कोटी 32 लाख रुपये आणि दुसर्‍या टप्प्यात 1 कोटी 77 लाख रुपये वितरित केले. आतापर्यंत विविध कामांसाठी 1 कोटी 89 लाख 37 हजार 297 रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. भाट्ये, रनपार, वायंगणी, मिर्‍या, काळबादेवी, वारे, मालगुंड, गणपतीपुळे, नेवेर, नांदिवडे, वेळणेश्‍वर, हेदवी, पालशेत, कोळथरे, आंजर्ले, मुरुड,  हर्णै, केळशी, वेळास, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, आंबोळगड, वाडातिवरे, जैतापूर, वाडापेठ, कशेळी या किनार्‍यांवर मेरिटाईम बोर्डाने सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ आणि निर्मल राहण्याकरिता पर्यटकांशी संवाद साधण्यात आला. 

पावसाळ्यात भरतीच्या लाटांमुळे किनार्‍यांची धूप होते.  ती टाळण्यासाठी किनार्‍यावर झाडे लावणे, वाळूशिल्प उपक्रम राबविण्यात येत आहेत. किनार्‍यावर पर्यटकांना सावलीसाठी छोट्या छत्र्या, वॉच टॉवर, जीवरक्षक, लाईफ जॅकेट, बोया, प्रथमोपचार किट, सागरी सुरक्षा साहित्य, वाहनतळ, धार्मिक विधीसाठी शेड, कचरा ट्रॉली ठेवण्यात आले आहे. किनार्‍यावरील सनसेट पॉइंटचा आनंद घेता यावा, यासाठी आवश्यक शेडही उभारण्याचे काम या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे.

पर्यटनवाढीसाठी राबविलेल्या उपक्रमात सर्वाधिक चांगले काम करणार्‍या ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचे सर्वेक्षण एप्रिल महिन्यात केले जाणार आहे. त्यासाठी त्रयस्थ समितीकडून किनार्‍यांची पाहणी केली जाणार आहे.  पर्यटकांचा प्रतिसाद, केलेली कामे, रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या उपक्रमांचे फलित याची तपासणी यामध्ये होईल. यातून उत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर  मूल्यांकन होणार असून यामुळे जिल्ह्यातील 26  समुद्रकिनार्‍यांना झळाळी मिळाली असून हे किनारे उन्हाळी हंगामात येणार्‍या पर्यटकांसाठी सज्ज झाले आहेत.