Sun, Jan 19, 2020 21:54होमपेज › Konkan › पदवीधर निवडणुकीत डावखरेंची कसोटी 

पदवीधर निवडणुकीत डावखरेंची कसोटी 

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:28PMरामपूर : वार्ताहर

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले निरंजन डावखरे यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. भाजपबरोबरच शिवसेनेने उमेदवार दिल्यास हा डाव अडचणीचा ठरणार असून  त्यातच भर म्हणून भाजपतील नाराजीचा त्यांना फटका बसणार आहे. 

येत्या 25 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वीच पदवीधर आमदार डावखरे यांनी भाजपत प्रवेश करून राष्ट्रवादीला जोरदार धक्‍का दिला. त्यामुळे आता या पक्षावर या निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे तर भाजपमध्ये या निवडणुकीसाठी अन्य काहीजण इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयात केलेले डावखरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्याचा फटका डावखरेंना बसण्याची शक्यता आहे. 

पदवीधर मतदारसंघातून भाजपमधून मिलींद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, डॉ. विनय नातू, नीलेश चव्हाण आणि संदीप लेले हे इच्छुक होते तर या आधी राष्ट्रवादीने डावखरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादीतून विजयी होण्यात शंका असल्याने डावखरे यांनी भाजपत प्रवेश करून थेट उमेदवारी मिळविली.  यामुळे भाजपमधील इच्छुक नाराज झाले आहेत. भाजपचे संदीप लेले यांनी तर गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मतदारांना दिवाळी, नववर्ष शुभेच्छापत्रे आणि फोनच्या माध्यमातून लेले यांनी संपर्क सुरु ठेवला होता. मात्र, आयत्यावेळी डावखरे यांनी भाजपत उडी मारल्याने त्या पक्षातील उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. त्याचा फटका डावखरे यांना बसण्याचा मोठा धोका आहे. या उमेदवारीवरून भाजपच्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील एका गटात मोठी नाराजी आहे. याचा फायदा विरोधी पक्षाला होणार आहे. 

गेल्यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. त्यामुळे यावेळी ही जागा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी जोमाने प्रयत्न करणार असतानाच त्यांचा उमेदवार भाजपने पळविला. आता त्यांना उमेदवार शोधावा लागणार आहे. आगामी चार दिवसांत राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार आहे. 

पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीने काँग्रेस, शेकाप हिंदी महामंडळ, टी. डी. एफ, उर्दू मीडियम, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय यांचा  पाठिंबा घेतला आहे.  हा मतदारसंघ 48 तालुक्यांचा आहे. एकूण 90 हजार 254 मतदार नोंदणी झाली आहे. 

या मतदारसंघावर भाजपची दावेदारी होती.  मात्र, राष्ट्रवादीने डावखरे यांच्या माध्यामातून  ही मक्‍तेदारी मोडीत काढली. मात्र, आता तेच भाजपच्या वाटेवर गेले आहेत. असे असलेतरी डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक कसोटीची आहे या मतदारसंघात वसंतराव पटवर्धन, अशोक मोडक, संजय केळकर आणि त्यानंतर डावखरे विजयी झाले. मतदारसंघाच्या निर्मितीनंतर भाजपने येथे सलग चारवेळा विजय मिळविलेला आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीने हा मतदारसंघ भाजपकडून काढून घेतला तर आता भाजपने राष्ट्रवादीचा उमेदवारच आपल्या दावणीला बांधला आहे. त्यामुळे चुरस निर्माण होणार आहे. 

पालघर निवडणुकीतील सेना भाजपमधील वाद या निवडणुकीत रंगणार आहे. भाजपने उमेदवारीसाठी अनेकांना नाकारल्याने डावखरे यांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. त्यात शिवसेनेने आपल्या पदवीधर मतदारांमध्ये जागृती सुरु केली असून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आल्यास त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. शिवाय  डावखरे यांनी अचानक उडी घेतल्याने त्यांच्या बाजूने असणारे पदवीधर मतदार आता नाराजी व्यक्‍त करू लागले आहेत.

शिवाय गेल्या सहा वर्षांतील अपुरा लोकसंपर्क, पदवीधर लोकांच्या समस्या जाणून घेण्यात केलेले तोकडे प्रयत्न याचा फटका डावखरे याना बसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक निरंजन डावखरे यांच्यासाठी कसोटीची ठरणार आहे.