Tue, Jul 23, 2019 11:30होमपेज › Konkan › दापोली येथील सरोवर संवर्धनासाठी साडेनऊ कोटी!

दापोली येथील सरोवर संवर्धनासाठी साडेनऊ कोटी!

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMदापोली : प्रवीण शिंदे

शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन या योजनेतून दापोली तालुक्यातील तलावांना मंजुरी मिळाली असून, शासनाच्या सरावेर संवर्धनातून तालुक्यातील तलावांचे रूपडे पालटणार असून, पर्यटन विकासालाही गती मिळणार आहे. यासाठी थोडा थोडका नव्हे, तर तब्बल साडेनऊ  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दापोली तालुक्यातील एकूण 9 तलावांना शासनाची मंजुरी मिळाली असून, यातील उंबरशेत (गौरी तलाव) 1 कोटी 20 लाख 16 हजार 400 रुपये, जामगे (कोंडी तलाव) 1 कोटी 21 लाख 84 हजार, बुरोंडी (तेलेश्‍वर नगर) 1 कोटी 13 लाख 92 हजार 300, मुरुड (कोंड तलाव) 78 लाख 23 हजार 200, गिम्हवणे (गिम्हवणे तलाव) 42 लाख 61 हजार 700, विरसई (गोठण तलाव) 86 लाख 37  हजार 100, गुडघे (उंबरघर तलाव) 45 लाख 42 हजार 300, गावतळे (गावतळे तलाव) 2 कोटी 9 हजार 700 आणि जालगाव (भैरी तलाव) 1 कोटी 31 लाख 53 हजार 700 रुपये असा एकूण 9 कोटी 40 लाख 20 हजार 400 इतका निधी मंजूर झाला आहे. 

2006-07 या आर्थिक वर्षापासून राज्य सरोवर संवर्धन ही योजना शासनाने सुरु केली असून, दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदाच कोटीच्या घरात निधी प्राप्‍त झाला आहे. यातील काही निधी थेट सरपंचाकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केला असून, काही तलावांना मंजुरी मिळून धनादेश वाटपाचे काम शासन पातळीवरुन सुरु आहे. मात्र, अद्याप दापोली तालुक्यातील कोणत्याही तलावाचे बांधकामाचे काम सुरु झाले नाही. यातील गावतळे, बुरोंडी, जालगाव आदी तलाव शिवकालीन पुरातन असून, या तलावांचे शुशोभिकरण झाल्यास येथील पर्यटन वाढीस लागून ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारामध्ये भर देखिल पडणार आहे. 
राज्य सरोवर संवर्धन या योजनेतून मंजूर झालेल्या या तलावांच्या बांधकाम देखभालीसाठी गाव पातळीवर गाव समिती गठीत होणार असून, या समितीचा अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच हे असणार आहेत. यामध्ये तलावचे बांधकाम शुशोभिकरण जेष्ठ नागरिक कठ्ठा, उद्यान आदींचा यामध्ये समावेश असणार आहे. 

तलावांच्या शुशोभिकरणासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेऊन दापोलीतील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत गावतळे ग्रामपंचायतीला धनादेशही दिला आहे.  मात्र, पावसाळा जवळ आल्याने कोणत्याही गावामध्ये तलावाच्या शुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले नाही. सन 2018-19 या वर्षापासून तालुक्यातील नऊ तलावांचे बांधकामाचे शुभारंभ होणार असे दिसत आहे.  त्यामुळे 2019 या वर्षात दापोली तालुक्यामध्ये अनेक गावातून पाण्याचा प्रश्‍न या तलावांच्या शुशोभिकरणामुळे सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

पर्यटनाचा दर्जा मिळणार
तालुक्यातील बुरोंडी तेलेश्‍वरनगर येथील तलावाच्या सुशोभीकरणामुळे येथील बारा वाड्यांचा आणि बारा हजार लोक संख्येच्या गावांचा पाणीप्रश्‍न याद्वारे मिटण्यास मदत होणार आहे. सरोवर विकासामुळे येथील पर्यटनही वाढणार आहे. बुरोंडी हे मासेमारीचे नैसर्गिक बंदर म्हणून प्रख्यात आहे. येथील तालावाच्या सुशोभीकरणामुळे बुरोंडी गावाला पर्यटनाचा दर्जा प्राप्‍त होणार आहे. 

Tags : Nine and half crores, conservation, lake, dapoli, konkan news