Mon, Jan 27, 2020 12:29होमपेज › Konkan › तोडीसतोड शक्‍तीप्रदर्शनाने नीलेश राणेंचा अर्ज दाखल 

तोडीसतोड शक्‍तीप्रदर्शनाने नीलेश राणेंचा अर्ज दाखल 

Published On: Apr 02 2019 1:58AM | Last Updated: Apr 01 2019 10:42PM
रत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी - सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानचे उमेदवार नीलेश राणे यांनी युती उमेदवार विनायक राऊत यांच्या शक्तीप्रदर्शनाला तोडीसतोड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर केला. 
युतीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या मेळाव्याला जशी गर्दी होती, अगदी तशीच गर्दी स्वाभिमानच्या मेळाव्यालाही होती. सोमवारी 11 वाजून 44 मिनिटांचा मुहुर्त अर्ज भरण्यासाठी साधला. अर्ज भरल्यानंतर निलेश राणे, खा. नारायण राणे हे सभास्थळी पोहोचले. 

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरात जाऊन स्वाभिमानचे नेते व खासदार नारायण राणे, उमेदवार नीलेश राणे, आ. नितेश राणे, निलम राणे व पदाधिकार्‍यांनी दर्शन घेतले व विजयासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मारुती मंदिर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे अर्ज सादर केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उमेदवारांसह खा. राणे यांच्या गाड्यांचा ताफा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांचा ताफा अडवला. इंगळे यांनी पाचच व्यक्‍तींनी आत जावे यासाठी खा. राणे यांना विनंती केली.  पोलिसांच्या विनंतीनंतर आ. नितेश राणे हे खा. नारायण राणे यांच्या गाडीत येऊन बसले. उमेदवार नीलेश राणे हे खा. नारायण राणे व पदाधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात गेले व अर्ज सादर केला.  अर्ज सादर केल्यानंतर खा. नारायण राणे व नीलेश राणे, नितेश राणे हे सर्वजण सभास्थळी रवाना झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त जयस्तंभ परिसरात ठेवण्यात आला होता.

सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या अन्य भागात वाहतुकीमुळे ट्रॅफिक जाम झाला. त्यामुळे कार्यकर्तेही उशिराने सभास्थळी पोहचत होते.