Wed, Aug 21, 2019 06:05होमपेज › Konkan › सेना मराठी माणसांच्या विरोधात : नीलेश राणे

सेना मराठी माणसांच्या विरोधात : नीलेश राणे

Published On: Feb 01 2019 1:19AM | Last Updated: Jan 31 2019 11:13PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना आज मराठी माणसाच्या विरोधात चालली आहे. व्यवसाय करण्यासाठी पुढे येणार्‍या तरूणांच्या आड येण्याचे काम शिवसेनेवाले करत आहेत. त्यामुळे मराठी माणसांनी काय गप्प बसायचे? माझा तरूण उद्योगपती झाला पाहिजे आणि त्यासाठी तरूणांच्या मागे आपण सदैव उभे राहू, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या युवक कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे पूर्णगड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी तरूणांनी आपल्या भविष्याचा विचार करताना एक ध्येय डोळ्यांसमोर ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आजच्या तरूणांनी सदैव जागृत आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

सद्य:स्थितीत रत्नागिरीची काय अवस्था आहे? किती उद्योगधंदे उभे राहिले? किती तरूणांना आज नोकर्‍या मिळाल्या? रत्नागिरीतील तरूणांना रोजगार मिळत नाहीत. मुंबईत किती नोकर्‍या आहेत. 25 वर्षे शिवसेनेवाल्यांनी मुंबई लुटली आणि तेवढीच वर्षे रत्नागिरीही लुटतायत. स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे काम या शिवसेनेवाल्यांनी केले, अशी असल्याची टीका राणे यांनी केली.

यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सचिव दीपक बेंद्रे, प्रवक्ते नित्यानंद दळवी, मेहताब साखरकर, संकेत चंवडे, अविनाश पावसकर यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.