Sun, Jul 21, 2019 00:04होमपेज › Konkan › काजू प्रक्रिया अभ्यासासाठी नायजेरीयाचे पथक सिंधुदुर्गात

काजू प्रक्रिया अभ्यासासाठी नायजेरीयाचे पथक सिंधुदुर्गात

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 10:43PMसावंतवाडी :प्रतिनिधी 

कोकणातील काजू प्रक्रिया उद्योग शिकण्यासाठी नायजरिया देशातील  उद्योजकांची टीम सिंधुदुर्गात आली आहे. सोमवारी  त्यांनी सावंतवाडी  नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांची भेट घेतली. काजू, नारळ व आंबा यांच्यावर कोकणात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून उत्पादने घेतली जातात. मात्र, आफ्रिकेतील काजू बाहेर देशात पाठविला जातो. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. भारतातील हे शेती तंत्रज्ञान शिकून भारताप्रमाणे आफ्रिकेतील लोकांना रोजगार मिळावा यासाठी आपण आल्याचे त्यांनी सांगितले.  नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांचे  स्वागत केले.

कोकणातील लोक परदेशात जाऊन तेथील लोकांना प्रशिक्षण देतील. त्यामुळे कोकणातील लोकांना सुद्धा रोजगार मिळेल, असा विश्‍वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्‍त केले. नायझेरियामध्ये  भ्रष्टाचार वाढला होता. त्यामुळे शिक्षण घेऊनही तेथील युवकांना रोजगार मिळत नव्हता. त्यामुळे ते भारत किंवा अन्य ठिकाणी जात होते. पण आता परिस्थिती बदलली असून आम्हाला देशातच रोजगार उभा करायचा आहे. त्यासाठी आम्ही अभ्यास करण्यासाठी भारतात आलो आहोत, असे मत नायझेरियातील गोबॅको न. प. चे नगराध्यक्ष जॉन थॉमन यांनी सांगितले.

नाझेरियातील गोबॅकोचे नगराध्यक्ष जॉन थॉमन, आँगवराचे नगराध्यक्ष जॉफरू मोहम्मद, अप्रिका युथचे चेअरमन मुसा शाल, भावा बोस्को आदींच्या शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी सावंतवाडी न.प. ला भेट दिली. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, विनय सामंत यांच्यासह न. प.  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 जॉन थामन यांनी भारतीय संस्कृतीचे कौतुक केले. येथे शिकण्यासारखे भरपूर काही आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन आहे. तसे उत्पादन या भागातही आहे. मात्र, येथे काजूवर प्रकिया केली जाते, तर नायझेरीयात सामान्य माणसाला काजूतून कोणताही रोजगार मिळत नाही. त्यामुळे आमचे शिष्टमंडळ  भारतात आले आहे.

येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आम्ही करणार असून यानंतर नाझेरियामधून आणखी 25 नगराध्यक्षांचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. आम्हाला तेथील युवकांच्या हाती रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. 
जाफरू मोहम्मद म्हणाले, नाझेरीयामध्ये 15 ते 40 वयोगटातील तरूण रोजगाराच्या शोधात आहेत. तेथे त्यांच्यासाठी रोजगार नाही. नाझेरियामध्ये मोठ्या प्रमाणात आईल डेपो आहेत. पण त्याचा फायदा एकाच वर्गाला होतो. सर्वसामान्य लोकांना रोजगार द्यायचा असेल तर प्रकिया उद्योग काढले गेले पाहिजेत.

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नायझेरीयन शिष्टमंडळसावंतवाडीत  येते हे आमचे आम्ही भाग्य समजतो. हा पर्यटन दृष्ट्या विकसित भाग आहे. येथे काजू मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर प्रकिया उद्योगही आहेत. त्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. तसे उत्पादन नायझेरियामध्ये व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.  उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर यांनीही सावंतवाडीचे विशेष महत्त्व शिष्टमंडळाला पटवून दिले. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांनी प्रास्ताविक केले.

विनय सामंत हे या शिष्टमंडळाला घेऊन जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना भेटी देणार असून, हे शिष्टमंडळ काजू प्रकिया उद्योग पाहणार आहे. यासाठी त्यांनी हेडगेवार येथील प्रकल्प निवडला असून, तेथे ते अभ्यास करणार आहेत.