Tue, Jun 02, 2020 18:44होमपेज › Konkan › नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रत्नागिरीत रूजू

नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण रत्नागिरीत रूजू

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे मंगळवारी रत्नागिरीमध्ये दाखल झाले. दुपारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी त्यांचे स्वागत केले. नियोजनच्या बैठकीला आलेले पालकमंत्री व आमदारांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

येथील जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. प्रदीप पी. यांची माहिती तंत्रज्ञान महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदीप पी. यांची याच पदावर मुंबई येथे बदली झाली होती. मात्र, त्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. आणखी एका वर्षासाठी प्रदीप पी. यांना मुदतवाढ मिळाल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. नवे जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. चव्हाण हे भारतीय प्रशासन सेवेच्या 2007 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

ठाणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त या पदावर ते कार्यरत आहेत. स्मार्ट सिटी योजनेचा 5 हजार 500 कोटींचा ठाण्याचा प्रकल्प अहवाल त्यांनी तयार केला. यासाठी 4 लाखांपेक्षा अधिक नागरिकांची मतेही त्यांनी जाणून घेतली. त्यांच्या या कामगिरीमुळेच ठाणे शहराची पुढील फेरीत निवड झाली होती. शहर बदलाव प्रकल्पाचीही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 18 हजारपेक्षा अधिक बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. पंचवीसशे कोटी किमतीची 75 हेक्टर जमीन त्यांनी वर्षभरातच अतिक्रमणमुक्त केली. सामाजिक विकास, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रोजगार, पर्यावरण या विभागांमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापूर्वी त्यांनी ठाण्यासह जळगाव, नाशिक, नवी मुंबई, मुंबई, पालघर या ठिकाणीही काम पाहिले आहे.सध्या जिल्ह्यामध्ये फळझाड लागवड मोहीम जोमाने सुरू आहे. मात्र, शेतकरी वर्गाकडून दुसर्‍या टप्प्यात म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही मोहीम यशस्वी करण्याबरोबरच अन्य योजना राबवण्याची जबाबदारी नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यावर आहे.