Tue, Apr 23, 2019 13:54होमपेज › Konkan › नेतर्डे गौणखनिज उत्खनन : 1 कोटी 33 लाखांचा दंड निश्‍चित

नेतर्डे गौणखनिज उत्खनन : 1 कोटी 33 लाखांचा दंड निश्‍चित

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 10:05PMसावंतवाडी : प्रतिनिधी

नेतर्डे येथील विनापरवाना गौणखनिज उत्खननप्रकरणी महसूल विभागाच्या सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाने चौकशी सुरू करुन 1 कोटी 33 लाख रुपये दंडाची रक्‍कम निश्‍चित केली आहे. तर याप्रकरणी 7 जणांकडून एकूण 2 हजार 675.15 ब्रास इतके उत्खनन झाल्याची मोजमापे नायब तहसीलदार यांच्या 12 सदस्यीय पथकाने दिली असून कारवाईचा अहवाल तयार केला आहे.दरम्यान शुक्रवारी तिसर्‍या दिवशी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तहसीलदार सतीश कदम यांनी कारवाईचा अहवाल तयार केल्याचे उपोषणकर्ते जगदेव गवस यांना सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ठोस कारवाईशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर, नेतर्डे सरपंच प्रसाद कामत यांची रात्री उशिरापर्यंत उपोषणकर्त्यांशी चर्चा सुरू होती.

जगदेव गवस यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांना पाठविलेल्या लेखी पत्रानुसार मौजे नेतर्डे गावामध्ये होत असलेल्या गौण उत्खननाची पाहणी महसूल विभागाच्या पथकाने केली असता त्याठिकाणी अनधिकृत उत्खनन झाले असल्याचे आढळून आले आहे.पोलीस पाटील यांच्यामार्फत स्थानिक पंच बोलावूनही कोणीही पंच त्याठिकाणी उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे पोलीस पाटील यांच्या समक्ष उत्खननाची मापे घेण्यात आली. या उत्खनामध्ये नेतर्डे गावातील सर्व्हे नं. 44, हि.नं.1 या सामाईक मिळकतीत अवैध गौण खनिज उत्खनन केल्याचे  आढळून आले. हा सर्व्हे नंबर  455.50  हे.आर. क्षेत्राचा सामाईक सातबारा असून त्यामध्ये सुमारे 400 खातेदारांची नावे आहेत.

काही ठिकाणी पूर्वी उत्खनन केलेल्या खडड्डयांमध्येच पुन्हा यावर्षी उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. सामाईक मिळकतीमध्ये नेमकी कोणाची कोठे वहिवाट आहे हे समजून येत नाही. त्यामुळे पोलीस पाटील यांनी स्थानिक चौकशी करुन तसेच चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीप्रमाणे अंदाजित उत्खननधारक यांची मोजमापासहीत स्वतंत्र यादी तयार केली आहे. नवीन उत्खननाची मापे घेतली असता 2675.15 ब्रास जांभा दगडाचे उत्खनन झालेले आढळून आले. महसूलकडून याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून ही दंडाची रक्‍कम 1 कोटी 33 लाख रुपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. दरम्यान, उपोषणकर्ते जगदेव गवस यांची भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तालुकाध्यक्ष महेश सारंग, दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, मनोज नाईक, आरोग्य सभापती आनंद नेवगी उपस्थित होते. 

असे झाले उत्खनन!

स्थानिक चौकशीवरुन पेडणे-गोवा येथील दोघाजणांकडून  139.96 ब्रास,कळणे-दोडामार्ग येथील उत्खनन धारकांकडून 63.60 ब्रास,नेतर्डे-सावंतवाडी येथील दोघांकडून 74.20 ब्रास उत्खनन झाले आहे. याशिवाय मयडे म्हापसा - गोवा येथील उत्खनन धारकांकडून 1 हजार 187.27  ब्रास,  सातोसे - सातार्डा येथील उत्खननधारकांकडून 98.93 ब्रास तर 1 हजार 127.91 ब्रास उत्खनन सक्राळ पेडणे-गोवा येथील उत्खननधारकाकडून झाले असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.या सर्वांकडून  झालेल्या उत्खननानुसार दंड वसूल केला जाणार असल्याचे महसूलकडून सांगण्यात आले.