Tue, Nov 13, 2018 10:27



होमपेज › Konkan › निसर्गाने पांघरला हिरवा शालू!

निसर्गाने पांघरला हिरवा शालू!

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:15PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

निसर्ग हा मोठा विलक्षण जादूगार आहे. वर्षभर तो नित्यनेमाने निरनिराळया ऋतूंत आपली जादू दाखवत माणसाच्या मनावर गारुड करत असतो. पावसाचं आगमन म्हणजे हिरवाईने बहरणार्‍या ऋतुची चाहूल लागते. पावसाळी हंगाम सुरु होऊन महिनाभराचा कालावधी झाला असून, डोंगर हिरवाईने नटले आहेत. 

उन्हाळ्यातली झाडांची सळसळ कमी होऊन आता डोंगरदर्‍यातली पाण्याची खळखळ सुरू झाली आहे. एखाद्या घाटातून जाताना ओबडधोबड दगडांचे उतार, कोरड्या पडलेल्या या दगडांना असलेली पाण्याची ओढ आणि  यातून ज्येष्ठातल्या पावसाच्या सरी बरसून गेल्यावर तयार झालेले छोटेछोटे ओढे हे उन्हाळ्याने शिणलेल्या मनाची आणि डोळ्यांचीही तहान भागवतात. बोडक्या डोंगरमाथ्यांवरून तांबट पिवळसर किंवा काळसर मातीतून अधूनमधून डोकावणारी जमिनीवरची आणि झाडांवरचीही हिरवी-पोपटी पालवी नवचैतन्याची चाहुलच देत आहेत. 

निसर्गानं भूसृष्टीवर वसंतात चढवलेला हिरवा साज अधिकच खुलवून ताजा, टवटवीत आणि जिवंत करण्याचं काम ज्येष्ठ महिन्यातल्या आणि ग्रीष्माची चाहूल देणार्‍या पावसाच्या पहिल्या सरी करतात. या सरींचा मायेचा हात वृक्षराजीवरून फिरताच निसर्गात नवचैतन्य आलेलं जाणवतं. घाटातून खाली दरीत बघितलं तर कधी उतारावर तर कधी डोंगराखालच्या सखल भागात  हिरवीगार शेतं चौकडीची नक्षी दाखवतात. हे सगळं बघितलं की मन टवटवीत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर हल्ली विशेषत: मुंबई-पुण्यासारख्या सिमेंट-काँक्रिटच्या जंगलांनी वेढलेल्या शहरांमधली माणसं ही घर आणि ऑफिसच्या चक्रातून थोडीशी सुटका करून घेऊन मुद्दाम वर्षांसहलींना जातात आणि पुन्हा एकदा शरीर आणि मन टवटवीत झालं की नव्या जोमाने कामाला लागतात.अशा या हिरवाईने नटलेल्या निसर्गाकडे पाहताना मन ताजं आणि प्रफुल्लित तर होतंच, पण त्याला एक प्रकारची उभारीही मिळते. सप्तरंगांच्या रंगचक्रावर मध्यभागी येणारा हिरवा रंग हा भडक रंग आणि थंड रंगांमध्ये संतुलन साधण्याचं काम करतो. त्यामुळेच डोळ्यांना आणि मनाला तो शांत करतो.