Fri, Apr 26, 2019 09:46होमपेज › Konkan › नरडवे, तिलारी, अरूणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न लवकरच मार्गी : राजन तेली 

नरडवे, तिलारी, अरूणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न लवकरच मार्गी : राजन तेली 

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 11:03PMकणकवली : वार्ताहर

सिंधुर्ग जिल्ह्यातील नरडवे, तिलारी, अरूणा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून प्रलंबित आहेत़ या धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत नरडवे धरणग्रस्तांसोबत जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली होती. शेतकर्‍यांना शेतजमिनी व घर बांधणीसाठी प्लॉट अद्यापही देण्यात आलेले नाहीत. रखडलेल्या प्रकल्पांबाबत माहिती दिल्यानंतर ना़ गिरीष महाजन 17 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणार होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी या खात्यासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक लावल्याने ना. महाजन यांचा सिंधुदुर्ग दौरा रद्द झाला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी ना़ गिरीष महाजन हे  सिंधुदुर्ग दौर्‍यावर लवकरच येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली़

कणकवली येथे पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते़  गेली 18 वर्षे नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या गावातील मुंबईतील ग्रामस्थ व स्थानिक शेतकर्‍यांनी काम बंद पाडले होते. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी ना. महाजन हे जिल्ह्यात येणार आहेत. तिलारी प्रकल्पातील काहीजणांना अद्यापही वन टाईम सेटलमेंटची रक्कम मिळालेली नाही़  तिलारी धरणाचे पाणी अनेक गावांना पोहोचले नाही. वैभववाडी अरूणा पाटबंधारे प्रकल्पात अधिकार्‍यांच्या चुकांमुळे प्रकल्पग्रस्त भरडले जात असून  शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पग्रस्त अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्वच पाटबंधारे प्रकल्पासाठी ना़ गिरीष महाजन लवकरच जिल्ह्यात येतील, असा विश्‍वास राजन तेली यांनी व्यक्‍त केला़

प्रांत कार्यालयाच्या कारभाराविषयी महसुल मंत्र्यांकडे तक्रार करणार

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची प्रक्रिया धिम्या गतीने सुरू आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाकडून बाधित नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही. याविषयी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे नाराजी व्यक्‍त केली आहे. अनेक प्रकल्पग्रस्तांना प्रांताधिकारी कार्यालयाकडून त्रास होत आहे. त्यामुळे याविषयी आपण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे माजी आ. राजन तेली यांनी सांगितले.