Fri, Jan 24, 2020 21:44होमपेज › Konkan › वर्चस्वासाठी नारायण राणेंचा संघर्ष

वर्चस्वासाठी नारायण राणेंचा संघर्ष

Published On: Mar 30 2019 1:30AM | Last Updated: Mar 30 2019 12:38AM
चिपळूण : प्रमोद पेडणेकर

रत्नागिरी जिल्ह्यात प्रचाराच्या धुळवडीला वेग आला आहे. तळकोकणावरील मतदारसंघावर पकड मजबूत करण्यासाठी शिवसेना व स्वाभिमानमध्ये घमासान होण्याची शक्यता  आहे. स्वाभिमानच्या प्रचारार्थ स्वत: नारायण राणे मैदानात उतरले असल्याने वर्चस्वासाठी राणेंचा संघर्ष सुरू आहे.

राणे यांची दि. 30 रोजी  चिपळूण व अलोरे येथे जाहीर सभा होणार आहे, तर याच दिवशी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर आपला उमेदवारी अर्ज  दाखल करणार आहेत.  स्वाभिमान पक्षाने ही निवडणूक अस्तित्वाची व कोकणच्या राजकीय अस्मितेशी जोडली आहे. राणे यांनी उत्तर रत्नागिरीत लांजा व पुनस येथेही जाहीर सभा घेतल्या. देवरुख, रत्नागिरी तालुक्यातही त्यांच्या सभा होणार आहेत. स्वाभिमानचे पक्ष संघटन उत्तर रत्नागिरीत फारच कमजोर आहे. परंतु राणे यांच्या नेतृत्वाचा राज्यस्तरावर लौकीक आहे. त्यामुळे कमजोर संघटनाच्या बळावर अखेरच्या टप्प्यात शिवसेनेत तोडफोड करुन जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचाराची राळ उडवून वातावरण बनविण्याचा स्वाभिमान पक्षाचा प्रयत्न आहे.  विजयाचा आकडा गाठण्यासाठी सेना-भाजपमधील दरी कमी होणार नाही याची रणनिती नारायण राणे आपल्या स्तरावर आखत आहेत. 

दुसरीकडे शिवसेनेचे प्रत्येक गावागावात असलेले खोलवर संघटन, प्रत्येक तालुक्यावर असलेली पकड ढिली झालेली नाही. शिवसेना व राऊत यांची डोकेदुखी भाजपच्या पवित्र्यामुळे आणखी वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांत भाजपने स्थानिक पातळीवर आपली भूमिका संदिग्ध ठेवली आहे. स्थानिक पातळीवर आ. सदानंद चव्हाण, विनायक राऊत हे भाजप कार्यकर्त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीत असले तरी रत्नागिरी व राजापूर विधानसभा मतदारसंघात सेना-भाजपमधील दुरावा मोठा आहे. त्यासाठी भाजपमधील वरिष्ठांचीच मध्यस्थी वाद मिटवू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड, रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत ‘पॅचअप’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही नेते उघडपणे स्वाभिमानच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे. 

काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्यासमोर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून निवडणूक लढविण्याचे आव्हान असणार आहे.  बहुजन वंचित आघाडीचे मारूती जोशी यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. मारूती जोशी स्वत: कुणबी समाजातील आहेत. या मतदारसंघात कुणबी व्होट बँक आहे. त्याला दलित वंचित घटकांची साथ लाभली तर ते आव्हान उभे करू शकतात. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात आर्थिक गणिते जुळविण्यात ते कितपत यशस्वी होतात. यावरही अवलंबून असणार आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढत सध्यातरी प्रथमदर्शनी चौरंगी स्वरूपातील वाटत असली तरी शिवसेना उमेदवार विनायक राऊत व स्वाभिमानचे नीलेश राणे यांच्यातच खरा दुरंगी सामना आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात विनायक राऊतांना किती यश मिळते व भाजपची व्होट बँक आपल्याकडे झुकविण्यात नीलेश राणे यांना कितपत यश मिळते यावर या दोघांच्या जय-पराजयाचे गणित अवलंबून आहे.

दक्षिण रत्नागिरी राहणार केंद्रबिंदू
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये दक्षिण रत्नागिरीतील पाच तालुके जय-पराजयाचे पारडे झुकवू शकतात. सिंधुदुर्ग नीलेश राणे यांचा  गड आहे. त्यामुळे विनायक राऊत यांना उत्तर रत्नागिरीवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्यात भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे. विनायक राऊत यांना भाजपबरोबरचा दुरावा संपविणे अत्यावश्यक आहे. पुढील काही दिवसात उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांच्या सभेने हा दुरावा संपू शकेलही; परंतु तो मतदानात दिसायला हवा. स्वाभिमान हाही एनडीएचा घटक पक्ष असल्याने राणे हेही आपलेच अशा भूमिकेतून मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.