Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Konkan › कणकवली नगरपंचायतवर राणेंचाच झेंडा

कणकवली नगरपंचायतवर राणेंचाच झेंडा

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 9:59PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत खा. नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नगराध्यक्ष पदासहीत 17 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळविला आणि 
कणकवलीत ‘स्वाभिमानचा’ झेंडा  फडकावला. नगराध्यक्षपदी स्वाभिमानचे समीर नलावडे हे 37 मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजप-सेना युतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांना धक्‍कादायकरीत्या पराभवाला  सामोरे जावे लागले आहे. समीर नलावडे यांना 4094 मते तर संदेश पारकर यांना 4057 मते मिळाली. युती करूनही भाजप-सेनेला केवळ सहा जागांवरच विजय मिळाला. तर काँग्रेस आणि कणकवली विकास आघाडीची पाटी कोरीच राहिली आहे. 

या  विजयात आ. नितेश राणे हे खर्‍या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरले. या विजयानंतर आ. नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत या विजयाचा जल्लोष साजरा केला. खा. नारायण राणे हे देखील दुपारी तातडीने मुंबईहून कणकवली दाखल झाले. त्यांनी आ. नितेश राणे यांच्यासह विजयी उमेदवारांचे खास अभिनंदन केले. कणकवली न. पं. च्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात पार पडली. संपूर्ण जिल्ह्याचे या मतमोजणीकडे लक्ष लागले होते. सकाळी 10 वा. या मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पहिल्या फेरीतील पहिल्या सहा प्रभागांचे निकाल हाती आले. यामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सहा पैकी 4 तर राष्ट्रवादी एक अशा पाच जागांवर विजय मिळविला. तर भाजपला पहिल्या सहा प्रभागांपैकी केवळ एका जागेवरच यश मिळाले. सुरुवातच दणदणीत विजयाने झाल्याने स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या पहिल्या सहा प्रभागांत  नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत युतीचे उमेदवार संदेश पारकर हे केवळ 95 मतांनी आघाडीवर होते. 

Tags  : Konkan, Narayan Rane, party, won, Kankavli Nagar Panchayat, election