Fri, Apr 26, 2019 16:07होमपेज › Konkan › नारायण राणे यांचा आज एल्गार

नारायण राणे यांचा आज एल्गार

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 9:49PMराजापूर : प्रतिनिधी

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी विरोधात गुरुवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे रणशिंग फुंकणार आहेत. दि. 8 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता सागवे (कात्रादेवी) राजापूर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. माजी खासदार नीलेश राणे व काँग्रेसचे कणकवलीचे आ. नितेश राणे यांची तोफही यावेळी धडाडणार आहे. 

राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये हा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे पुनर्वसनाचा मोठा प्रश्‍न उभा राहणार असून प्रदूषणाचा प्रश्‍नही निर्माण होणार असल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने या प्रकल्पाविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या या लढ्याचे नेतृत्व खुद्द माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार आहेत. शिवाय कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठा जनाधार असलेले नेते आहेत. या प्रकल्पाबाबत स्वाभिमान पक्षाने स्थानिक जनतेच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणेच या प्रकल्प हद्दपारीचे निशाण फडकविणार आहेत. राणे यांच्यासारखा ताकदवार नेता आता प्रकल्प विरोधकांच्या लढ्याचे नेतृत्व करणार असल्याने येथील जनतेमध्ये उत्साह आहे. 

या सभेत रिफायनरी विरोधकांचा आवाज ते बुलंद करतीलच; पण या रिफायनरीबाबत सुरुवातीपासून ते आतापर्यंत शिवसेनेने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेचा बुरखाही फाडणार आहेत. शिवाय प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी स्वाभिमान पक्ष भक्‍कमपणे उभा असल्याचा विश्‍वासही राणे यावेळी देतील. राणे यांच्या या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू असून नाणार रिफायनरीला अखेरचा टोला हाणण्यासाठी या भागातील जनता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या झेंड्याखाली एकवटणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नीलेश राणे, नितेश राणेंचीही तोफ धडाडणार

रिफायनरी हद्दपारीसाठीच्या मेळाव्यात माजी खा. नीलेश राणे व काँग्रेसचे कणकवली-देवगडचे आमदार नितेश राणे हे आपण आक्रमक शैलीमध्ये प्रकल्पग्रस्तांना बळ देणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार असल्याने राणे कुटुंबीय या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले असून, त्यांच्या या सभेबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे.