Thu, Dec 12, 2019 08:09होमपेज › Konkan › सुनील तटकरेंच्या मदतीला खासदार नारायण राणे!

सुनील तटकरेंच्या मदतीला खासदार नारायण राणे!

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:13PMकणकवली : प्रतिनिधी

ओसरगाव महिला भवन येथे बुधवारी झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदर्ग जिल्हा कार्यकारिणीच्या  बैठकीत स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना स्वाभिमानचा पाठिंबा जाहीर केला. कोकणातून कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा उमेदवार विजयी होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी राणे यांनी दिला. दरम्यान राणे यांनी राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने  ही निवडणूक रंगतदार होणार असून पुन्हा एकदा कोकणात राणे आणि शिवसेना असा सामना रंगणार आहे. 

ओसरगाव येथे झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, उमेदवार अनिकेत तटकरे, आ. नितेश राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, सुदन बांदिवडेकर, विकास कुडाळकर यांच्यासह स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वाभिमानचे सिंधुदुर्गातील सर्व जि. प. सदस्य, नगरसेवक हे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देतील अशी घोषणा नारायण राणे यांनी केली. 

याबद्दल समाधान व्यक्‍त करताना सुनील तटकरे म्हणाले, नारायण राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा आपल्याला आनंदच आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून यापूर्वी विजयी झालेल्या भास्कर जाधव, अनिल तटकरे यांच्या विजयात नारायण राणे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता अनिकेत तटकरे यांच्या विजयातही राणेंचा सिंहाचा वाटा असेल असे ते म्हणाले. राजकारणापलीकडे जाऊन राणेंचे आणि आपले कौटुंबीक संबंध आहेत. बॅ. अंतुले, मनोहर जोशी आणि नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र मुख्यमंत्री झाले. आपण कोकणचा सुपुत्र म्हणून अर्थमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम नारायण राणे यांनी आपल्याला शुभेच्छा देऊन वेळोवेेळी मार्गदर्शन केले आणि कोकण विकासासाठी आवश्यक ते सहकार्यही केले. अशा शब्दात सुनील तटकरे यांनी राणेंविषयी कृतज्ञता व्यक्‍त  केली.