सावंतवाडी ः प्रतिनिधी
संजू परब यांची कार जाळपोळ प्रकरणात राजकारण नाही. आपला जिल्हा पोलिसांवर विश्वास आहे. ते या प्रकरणाचा निःपक्षपाती तपास करतील, असा विश्वास खा. नाराय राणे यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद आहे की नाही, याबाबत जे दहशतवादाबाबत बोलतात त्यांनाच विचारा, असे ते म्हणाले.
सावंतवाडी येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपर्क कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब, जि. प. च्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, पक्ष निरीक्षक सुदन बांदिवडेकर, सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, विशाल परब, सुधीर आडिवरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. राणे म्हणाले, श्री. परब यांच्य कार जळीत प्रकरणात राजकारण किंवा दहशतवादाचा कोणताही मुद्दा नाही. या गाडी जाळपोळ प्रकरणात मी कोणावर आरोप करणार नाही. या प्रकरणाचा तपास करण्यास जिल्हा पोलिसांची यंत्रणा सक्षम आहे व आपल्या पोलिसांवर विश्वास आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही दहशतवाद नाही. आपल्या राजकीय फायद्यासाठी कोणी जिल्ह्याला बदनाम करीत असेल तर ते चुकीचे असल्याचे ते म्हणाले.शिवसेना सोडून सर्व पक्ष लोकसभेसाठी नीलेश राणे यांना नक्की सहकार्य करतील, त्यासाठी अनेक जण संपर्कात असल्याचा दावा व विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या दोन जागा लढविणार
राज्यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि औरंगाबाद अशा दोन जागा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लढविणार आहे. अन्य जागांबाबत विचार करू असे त्यांनी सांगितले. आपण एनडीएबरोबर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र निवडणुकीत कोणाचाही पाठिंबा घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.