Mon, Jun 17, 2019 02:11होमपेज › Konkan › ...तर मी संन्यास घेईन : राणे

‘गीते, राऊत यांच्या आग्रहामुळेच रिफायनरी’

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:54PMराजापूर/जैतापूर : प्रतिनिधी

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीला शिवसेनेचा असलेला विरोध हा खोटा असून शिवसेनेचे मंत्री अनंत गीते व खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरून कोकणच्या माथी हा प्रदूषणकारी प्रकल्प मारला आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.

तालुक्यातील सागवे येथे ग्रीन रिफायनरीच्या हद्दपारीसाठी गुरुवारी सायंकाळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खा. नीलेश राणे, आ. नितेश राणे, राजन देसाई, जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांनी कोकणला काय दिले? असा खडा सवाल करून येथे शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने कोकणवासीयांसाठी उद्योग आणलेला नाही, असा घणाघातही राणे यांनी केला. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आणलेला नाही, तर हे पाप शिवसेनेचेच आहे. या प्रकल्पासाठी गीते व राऊत यांनीच प्रयत्न केले होते, मात्र, राऊत याबाबत आता खोटे बोलत आहेत, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. हा रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रकल्प कसा विनाशकारी आहे, याबाबत पटवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

रिफायनरी प्रकल्प विरोधासाठी आक्रमकपणे प्रयत्न करत असलेल्या रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मारहाण झाल्यानंतर एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना इंजेक्शनच्या साह्याने जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हा  प्रयत्न त्यांच्या पत्नीने हाणून पाडला, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आंदोलन करणार्‍या महिला रणरागिणीसारख्या लढल्या हे कौतुकास्पद असून आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा प्रदूषणकारी प्रकल्प हटवणे हा जीवन मरणाचा प्रश्‍न असून प्रकल्प हटवण्यासाठी  कोकणी माणसाच्या पाठी राणे कुटुंबीय राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कोकणी माणसामुळे शिवसेना घडली. मात्र, येथील प्रश्‍नांबाबत शिवसेनेच्या मंत्री, खासदार, आमदारांनी कधी प्रश्‍न मांडले ते सांगा? सेनेचा प्रकल्पाला खरा विरोध  असल्याचे सिद्ध केल्यास मी संन्यास घेईन, असे आव्हानही राणे यांनी दिले. 

माजी खा. निलेश राणे यांनी आपण सर्वात प्रथम या प्रकल्पाला विरोध केल्याचे सांगून शासनाची माणसे मोजणी करायला आली त्यावेळी आपल्याला येथील प्रकल्पग्रस्तांनी संपर्क साधला. त्यावेळी आपण रातोरात प्रकल्पस्थळी धावत आल्याची आठवण त्यांनी करून दिली. या प्रकल्पाला स्थगिती मिळावी म्हणून आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती. परंतु, या प्रकल्पात राजकीय हस्तक्षेप नको म्हणून लोकभावना व्यक्‍त झाल्या. त्यामुळे आपण याचिका दाखल केली नाही, असे ते म्हणाले. हा प्रकल्प नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निश्‍चित रद्द होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. यावेळी आ. नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही त्यांनी टीकेची झोड उठवली.