होमपेज › Konkan › काँग्रेसची घडी बसत असताना, नारायण राणे एकाकी

काँग्रेसची घडी बसत असताना, नारायण राणे एकाकी

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 19 2017 2:00AM

बुकमार्क करा


रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर कोकणातील काँग्रेस संपणार अशी हवा निर्माण करण्यात आली होती. परंतु, नारायण राणेच एकटे पडले असून काँग्रेसची विस्कटलेली घडी बसत आहे. काँग्रेसपासून दुरावलेले जुनेजाणते नेते पक्षात परतु लागले आहेत. लवकरच जिल्ह्याची घडी बसून पदाधिकारी निवडी होतील, असे काँग्रेसचे प्रभारी विश्‍वनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, त्याचवेळी कोणते नेते परतले? जिल्हाध्यक्ष पदासाठी सक्षम दोन नेत्यांची नावे सांगा, या प्रश्‍नांवर प्रभारी काहीसे गोंधळले आणि मी नवीन आहे, सांभाळून घ्या, अशी विनंती केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसची संघटनात्मक स्थिती सुधारण्यासाठी कुणबी समाजाचे नेते विश्‍वनाथ पाटील यांच्यावर जिल्हा प्रभारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत चार जिल्हा दौरे केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून गेलेले नेते स्वगृही परतून कार्यरत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला उभारी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसजनांना ऊर्जा मिळावी म्हणून जिल्ह्यात मेळावा आयोजित केला जाणार आहे. येत्या महिनाभरातच हा मेळावा होणार असून यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

एकेकाळी जिल्ह्यातील कुणबी समाज काँग्रेसच्या पाठीशी होता, तो आता शिवसेनेकडे वळला असून या समाजाला विश्‍वासात घेऊन काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांना सक्रिय केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. नाणार रिफायनरीमध्ये शेतकर्‍यांच्या सुपिक जमिनी जात आहेत. शेतकर्‍यांना नष्ट करून विकास नको, त्यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचे विश्‍वनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले. कोकणात सिंचन नाही त्यामुळे शेतकर्‍याला एकाच पावसाळी पिकावर अवलंबून रहावे लागते. त्यात अवकाळी पाऊस, इतर आपत्ती पाचवीलाच पूजलेली आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, यासाठी पंचनामे केले जावेत, अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी काँग्रेसचे नेते अशोक जाधव, महिला नेत्या अ‍ॅड. ए.ए.आगाशे, हारिस शेकासन आदी उपस्थित होते.