होमपेज › Konkan › कोकणचे प्रभावी नेतृत्व नारायण राणे आता राज्यसभेत

कोकणचे प्रभावी नेतृत्व नारायण राणे आता राज्यसभेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खासदार नारायण राणे... गेली तीन दशके महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावीपणे वावरणार्‍या नारायण राणे यांना या निमित्ताने आणखी एका नव्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अलिकडच्या काळात सिंधुदुर्ग सुपूत्र असलेले कै. एकनाथ ठाकूर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, सध्याचे केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू आणि त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याचा सन्मान मिळाला आहे. गेल्या वर्षभराच्या अनेक राजकीय घडामोडीनंतर राणे खासदार म्हणून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यासाठी भाजपने त्यांना मदत केली आहे. येत्या 3 एप्रिल रोजी राणे दिल्लीत जाणार आहेत. परंतु ‘आपण दिल्लीत जाणार आहोत, पाकीस्तानात नाही’ असे उद‍्गार काढून जरी आपण राज्यसभेवर निवडून आलो असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 

नारायण राणे यांची कोकणातील गेल्या 28 वर्षांची राजकीय कारकिर्द चढ आणि काहीशा उताराची असली तरी ती रोमहर्षक आहे. तिसरी इयत्तेत शिक्षण सुरू असताना कणकवली तालुक्यातील वरवडे येथील हा मुलगा नातेवाईकाच्या लग्नासाठी म्हणून मुंबईला जातो, तिथेच राहतो, पुढील शिक्षण घेतो आणि पुढे तो चक्क राज्याचा मुख्यमंत्री बनतो. या आश्‍चर्यकारक यशामागे महत्त्वाकांक्षा, जिद्द, मेहनत, चिकाटी हे सगळे गुण अंगाशी असल्याशिवाय ते शक्य नाही. नगरसेवक, नंतर बेस्ट समितीचे अध्यक्ष, नंतर कणकवली-मालवण मतदारसंघातून आमदार, मग पशुसंवर्धन-मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री, महसूलमंत्री आणि मग मुख्यमंत्री. विरोधी पक्षात असताना विधिमंडळाचा विरोधी पक्षनेता, मग पुन्हा मंत्री, अगदी विधान परिषदेचे आमदारपद आणि आता राज्यसभेचे खासदारपद, अशा विविध पदांवर काम करणारा एक प्रभावी राजकीय नेता म्हणून राणे यांची नोंद देशाच्या राजकारणात झाली आहे. 

राणे यांचा आजवरचा राजकीय प्रवास तसा वादळासारखाच झाला. मुंबईतील एक नगरसेवक असलेल्या नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत मालवण-कणकवली मतदारसंघातून उतरविले आणि त्यावेळच्या प्रस्थापित काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून जवळपास दहा हजाराच्या मताधिक्याने ते विजयी झाले. सत्तेत असलेल्या काँग्रेसशी संघर्ष करत राणे यांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात संघटनेचे जाळे निर्माण केले. 1995 च्या निवडणुकीत ते स्वत: निवडून आलेच त्याशिवाय कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना निवडून आणण्यात त्यांनी मोलाचा  वाटा उचलला. त्यामुळे 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पहिल्या 9 मंत्र्यांमध्ये राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.  

दोन-तीन वर्षे पशुसंवर्धन खात्याचे मंत्री म्हणून काम करता करता त्यांना महसूलसारखे राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे खाते मिळाले. तिथेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचीही बिजे रोवली गेली. शिवसेनेने त्यांच्या धडाकेबाज निर्णय क्षमतेची दखल घेत मुख्यमंत्रीपदही बहाल केले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्याच सिंधुदुर्ग सुपूत्राला त्यांच्यारुपाने संधी मिळाली होती. 1999 च्या निवडणुकीत युती सरकार पायउतार झाल्यानंतर पुढील सहा वर्षे त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून विधिमंडळ गाजविले. 2005 सालात शिवसेनेच्या नव्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उभे करत शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रक्रियेत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढा गदारोळ झाला. शिवसेनेशी मुंबईतच राणे यांनी दोन हात केले. बघता बघता ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. मध्ये एकदा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राणे यांना मुख्यमंत्री पदाची संधी चालून आली होती.

काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनविले. राणे यांनी जाहीरित्या नाराजी व्यक्‍त करत काँग्रेसशी दोन महिन्यांसाठी काडीमोड घेतला होता. त्यावेळीही राज्याच्या राजकारणात वादळ उठले होते. अखेरीस काँग्रेसमध्ये घडामोडी घडल्या आणि राणे यांनी यू टर्न घेतला. ते पुन्हा उद्योगमंत्री झाले.  2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सपाटून मार खाल्ला. त्यानंतर गेल्या तीन वर्षाच्या काळात काँग्रेसच्या राजयस्तरावरील नेतृत्वाने काँग्रेस पक्ष वाढीसाठी योग्यरित्या काम केले नाही असा ठपका ठेवत राणे यांनी पुन्हा बंड पुकारले. यावेळी मात्र काँग्रेसमुक्त होवून त्यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. भाजपच्या मदतीने आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

2014 सालच्या निवडणुकीत राणे यांना हार पत्करावी लागली. नंतर मुंबईत विधानसभेच्या बांद्रा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव पत्करावा लागल्याने राणे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा राजकारणात पूर्वीसारखे उभे कसे राहणार? असा प्रश्‍न राजकारणातील त्यांच्या चाहत्यांना आणि राजकीय अभ्यासकांनाही पडला होता. परंतु काँग्रेसमधूनही बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेवून, चक्क नवा पक्ष स्थापन करून ते राज्यसभेत पोहोचले आहेत. पुढील सहा वर्षे ते राज्यसभेचे सदस्य असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रात पुन्हा सरकार आले तर राणे केंद्रात मंत्री झाले तर आश्‍चर्य वाटायला नको.

राणे यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रवेश होणार की ते राज्यसभेवर जाणार याबाबतची उत्सुकता गेले काही महिने कोकणवासीयांना होतीच. राज्यसभेवर ते बिनविरोध निवडून आल्यानंतर कोकणचे प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडणारा एक प्रभावी नेता संसदेत विराजमान झाल्याची भावना कोकणातील लोकांनी बोलुनही दाखविली. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर नारायण राणे सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. कणकवलीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार मंडळी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली, त्यावेळी राणे यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने आणि दर्जेदार व्हावे त्याशिवाय ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत अशा सर्वांना योग्य तो मोबदला मिळायलाच हवा असे मत व्यक्त केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या सोबत बसलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना त्यांनी महामार्गाला जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांची बैठक घ्यावी आणि त्यांचे मोबदला विषयीचे प्रश्‍न समजून घ्यावेत, त्याचा अहवाल आपणाला सादर करावा, आपण हे प्रश्‍न तत्काळ सोडवू ,अशा सूचना दिल्या. 

राणे यांना कोकणातील अनेक प्रश्‍न संसदेत मांडण्याची संधी आहे. महामार्गाच्या प्रश्‍नाबरोबरच सीआरझेडसारखा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही, इकोसेन्सेटीव्ह गावे जाहीर झाल्याने विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे याकडेही लक्ष वेधण्याची संधी आहे. हत्ती अतिक्रमण म्हणा किंवा परप्रांतीय मच्छिमारांचे सिंधुदुर्ग समुद्रातील अतिक्रमण म्हणा असे अनेक प्रश्‍न संसदेसमोर ठेवणे आवश्यक आहेत. 1985 पासून आतापर्यंत राणे सार्वत्रिक निवडणुका लढवून निवडून येत होते. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न अधिक तपशीलवारपणे त्यांना ज्ञात आहेत. पर्यटन विकासाचा प्रकल्प अधिक वेगाने पुढे नेण्याची संधी त्यांना आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि कोल्हापूर-वैभववाडी व कराड-चिपळुण या दोन नव्या रेल्वे मार्गांचा पाठपुरावा करून ते प्रकल्प मार्गी लावण्याचीही संधी त्यांच्यासमोर आहे. एवढेच नव्हे तर कोल्हापूर-वैभववाडी सारख्या नव्या राष्ट्रीय मार्गांची पुनर्बांधणी करण्याचा प्रकल्प राणे मार्गी लावू शकतात. अशी कितीतरी कामे करण्याची संधी त्यांना असून कोकणच्या हिताच्यादृष्टीने ही कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. 

असे म्हटले जाते महाराष्ट्रातील प्रभावी नेता दिल्लीत केंद्राच्या राजकारणात गेला तर तो रमत नाही. त्यासाठी अनेक उदाहरणे दिली जातात. म्हणूनच राणे यांचा दिल्लीच्या राजकारणात वावर कसा असेल आणि त्यांची पुढची वाटचाल कशाप्रकारे असेल याची उत्सुकता आहेच!

- गणेश जेठे

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Narayan Rane, Rajya Sabha,


  •