Sun, May 26, 2019 08:41होमपेज › Konkan › सेनेला कोकण संपवायचाय : नारायण राणे (Video)

सेनेला कोकण संपवायचाय : राणे (Video)

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 12:30PMचिपळूण : खास प्रतिनिधी

शिवसेना नाणारबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. आजपर्यंत शिवसेनेने विविध मुद्द्यांवर बारा वेळा राजीनामा देतो, असे सांगितले. मात्र, सेना कधीही सत्तेपासून दूर राहणार नाही. नाणार प्रकल्पाबाबत स्वाक्षरी करताना यांना का अडविता आले नाही? सेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी या स्वाक्षरी केल्या आहेत ना? मग विरोध कोणत्या तोंडाने करता? शिवसेनेला कोकण संपवायचा आहे. पेट्रोकेमिकल कंपनीमुळे होणार्‍या परिणामांमुळे येथील लोकांनी जगायचे कसे? शिवसेनेने चाळीस वर्षांत कोकणसाठी काय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खा. नारायण राणे यांनी केले.

शहरातील बाळासाहेब माटे सभागृहात बुधवारी सायंकाळी पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी माजी खा. नीलेश राणे,  जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, सतीश सावंत, मंगेश शिंदे, राजन देसाई, सर्व तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. यावेळी खा. राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेना फक्‍त पैशांसाठी आहे. जिल्ह्यातील आमदार-खासदार काही कामाचे नाहीत. सर्व सत्तास्थाने सेनेकडे असतानाही जिल्ह्याचा विकास होत नाही. या जिल्ह्यात असलेल्या मंत्र्यांनी रत्नागिरीसाठी काय दिले? पालकमंत्री वायकर जिल्ह्यात पाहुण्यासारखेच येतात. मात्र, असे असतानाही येथील जनता शिवसेनेला कसे काय मतदान करते, असा सवाल केला. आपण स्थापन केलेला पक्ष  शब्द पाळणारा पक्ष आहे. त्यामुळे आता येथील लोकांनी परिवर्तनाचा विचार करायला हवा. आपल्या पक्षाला नेते नकोत, कार्यकर्ते हवे आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही सत्तेवर येऊ शकतो. वेळ आल्यास आम्ही राज्यात 288 जागा लढवू, असेही ते म्हणाले.

कोकणातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. विकासासाठी निधी नाही. नवीन उद्योगधंदे नाहीत. रिफायनरी आणणे म्हणजे विकास नव्हे. उद्धव ठाकरे हे केवळ पैशांचे राजकारण करीत आहेत, असा आरोप करुन विकासासाठी रत्नागिरीमध्ये केवळ पाच वर्षे संधी द्या. जर रत्नागिरीत विकासाचे परिवर्तन केले नाही तर राजकारण सोडेन, असेही खा. राणे यांनी जाहीर सभेत सांगितले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी पक्षाची ध्येयधोरणे सांगताना, या पुढील काळात रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार स्वाभिमानचा असेल, असे सांगितले. 

सेनानेत्यांना मुख्यमंत्री भेटत नाहीत...

आपण जात-पात मानत नाही. मात्र, मराठा समाजाचा घटक आहोत. महाराष्ट्रात 34 टक्के मराठा समाज आहे. मात्र, त्यातील तीस टक्के समाज गरीब व दुर्बल आहे. आपण समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आयोगासाठी अध्यक्ष झालो आणि समाजाला आरक्षण दिले. मात्र, शिवसेनेची सत्ता आली आणि आरक्षण गेले. आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे समाजाला आरक्षण द्या, असे सांगतात. शिवसेनेच्या नेत्यांना सत्तेत असून मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. मात्र, आपण तीन वेळा या मुद्द्यावर त्यांची भेट घेतल्याचे खा. नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

(व्हिडिओ : लक्ष्मीकांत घोणसे-पाटील, गिमवी)