Sun, Dec 15, 2019 03:19होमपेज › Konkan › कणकवली नाक्यावर कधी येऊ, ते सांगा? : उदय सामंत 

कणकवली नाक्यावर कधी येऊ, ते सांगा? : उदय सामंत 

Published On: Jan 14 2019 1:20AM | Last Updated: Jan 14 2019 12:30AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

उदय सामंत दादागिरी, मारामारीला घाबरत नाहीत. सिंधुदुर्ग ही जन्मभूमी तर रत्नागिरी ही माझी कर्मभूमी आहे. माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. कधी कणकवलीच्या नाक्यावर येऊ ते सांगा असे प्रतिआव्हान म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी राणे पिता-पुत्रांना दिले.

खंडाळ्याच्या सभेत आमदार सामंत आक्रमक झालेले दिसून आले. आम्ही अडीच आमदार आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आईवडिलांचे ऐकतो.  तुमचे काय, असा सवाल त्यांनी नीलेश राणेंना केला. आई-वडीलांचे संस्कारच आम्हाला समाजात वावरताना उपयोगी पडत आहेत. नीलेश राणे सध्या एकच अभंग सगळीकडे गात असल्याचे सांगतानाच या तालुक्यात एकतरी गाव असे दाखवा ज्या गावात विकास काम केले नाही, असे आव्हान आ. सामंत यांनी दिले.

काही लोक खालच्या थराला जाऊन टीका करीत आहेत. आमची ती संस्कृती नाही. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानमध्ये गेलेली मंडळी पंधरा दिवसापूर्वीपर्यंत माझ्याकडे यायची व जेलमध्ये जाण्यापासून वाचवा म्हणायची. यापुढे कुणाला परत थारा देऊ नका अशा सूचना आ. सामंत यांनी तालुकाप्रमुखांना सभेमध्येच दिल्या.

वाटदमध्ये सेनेची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी येथील प्रमुख पदाधिकारी आपल्याकडे आले व 12 जानेवारीला मेळावा घ्याच म्हणून मागे लागले. या जि.प. गटात कोणी कितीही उड्या मारल्या तरी शिवसेना खा. राऊत यांना 10 हजारांचे मताधिक्य या गटातून  देऊ ,असे आ. सामंत यांनी सांगितले. यापूर्वीच्या मेळाव्यात माणसे उशिराने आली म्हणून नेते मंडळी खोळंबली होती. मात्र सेनेच्या मेळाव्यात कार्यकर्ते चार वाजल्यापासून बसून खासदार येण्याची वाट पाहत होते, हा शिवसेनेमध्ये फरक असल्याचे सांगत आ. सामंत यांनी  निशाना साधला.

गेल्या काही महिन्यापासून आपल्या कुटुंबीयांवर टीका केली जात आहे. अडीच आमदार असल्याचे बोलले जाते. आम्ही आहोत. एकाच्या जागी तीन माणसे आमदार म्हणून काम करीत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अण्णा, भय्या धाऊन जात आहेत. जनतेची कामे लवकर होत असल्याचे समाधान असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.

या मेळाव्याला वाटद जि.प. गट वगळता अन्य गटातील एकही कार्यकर्ता  आलेला नाही. सेनेच्या पे्रमापोटी ही जनता आलेली असल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. येथील मुस्लीम समाजाचेही शिवसेनेवरच प्रेम आहे. या समाजाला सेनेनेच न्याय दिला आहे. रनपमध्ये सभापतीपदे असो की अन्य पदे सेनेनेच दिली आहेत. येथील जनतेचा विश्‍वास दादागिरीवर नाही, असे सांगतानाच या गटात यापुढेही सेनाच एक नंबर कशी राहील याकडे शिवसैनिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रत्नागिरीत येऊन माझा पराभव करु शकले नाहीत ते कालपरवा आलेले माझा पराभव काय करणार, असा प्रतिप्रश्‍नही आ. सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रादेशिक नळपाणी योजनेतील वरवडेचा पाणी पुरवठा मी बंद केला असा डांगोरा पिटला जात आहे. या योजनेसाठी शासनाने 32 कोटीचा निधी मला दिला आहे. ही योजना झाल्यावर 24 तास गावांना पाणी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक जाहीर व्हायची आहे. पण खा. राऊत यांच्या निवडणुकीचा नारळ आजच खंडाळ्यातून वाढवू असे सांगत अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आ. सामंत यांनी केले.