Mon, Jan 21, 2019 15:42होमपेज › Konkan › राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश; कोकणचे राजकारण बदलणार?

राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश; कोकणचे राजकारण बदलणार?

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 21 2017 1:13PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्ग : गणेश जेठे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश आता निश्‍चित मानला जात आहे. त्यामुळे कोकणच्या राजकारणात काही प्रमाणात बदल घडतील, अशी शक्यता आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नारायण राणे यांना मंत्रिमंडळात प्रवेश देण्याबाबतची घोषणा केली. भाजपच्या कोट्यातील मंत्रिपद देण्याची ‘स्ट्रॅटेजी’मुख्यमंत्र्यांनी अवलंबली असून शिवसेनेची नाराजी रोखण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. अर्थातच राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार आहे. कदाचित मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेल्या महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांपैकी बांधकाम खाते राणे यांच्याकडे दिले जाऊ शकते. 

राणे यांनी नवा पक्ष स्थापन केला तरी सत्तेशिवाय संघटन वाढविणे आणि ते मजबूत करणे खूप कठीण असते. आता राणे यांना मंत्रिपद मिळाले तर त्यांना पक्षवाढीसाठी बळ मिळेल आणि कार्यकर्ते टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकेल. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांची संघटना गावागावांत आहे. त्या तुलनेत रत्नागिरी आणि उत्तरेकडे  रायगड जिल्ह्यात राणे यांचे संघटन कमी आहे. 

मंत्रिपद मिळाल्यानंतर उत्तरेकडे संघटन वाढीसाठी त्यांना ताकद मिळू शकते. गेल्या आठवड्यात राणेंचा पश्‍चिम महाराष्ट्रात दौरा झाला. कोल्हापूर, सांगलीत सभा झाल्या. पुढे ते महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जर त्यांनी महाराष्ट्रात इतरत्र संघटन वाढीसाठी प्रयत्न सुरू केल्यास त्यांना या मंत्रिपदाचे बळ मिळेल, असेही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

राणे यांच्या रूपाने सेनेसमोर एक मोठे आव्हान 

सध्या कोकणात शिवेसेनेची ताकद मोठी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार संस्थांमध्ये राणे यांची सत्ता आहे. मात्र, सिंधुदुर्गातील बहुतांश आमदार ,खासदार आणि मंत्री सेनेचे आहे; मात्र विकास प्रक्रियेबाबत  सध्या सरकारकडून लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्याचे समाधान लोक व्यक्‍त करत नाहीत. अशा परिस्थितीत राणे यांनी मंत्रिपदाचा वापर करून विकास प्रक्रियेला गती दिली तर राणे आपल्या बाजूने लोकांना पुन्हा वळवू शकतात. परिणाम स्वरूप, 2019 च्या सालातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांपूर्वी राणे यांच्या रूपाने सेनेसमोर एक मोठे आव्हान उभे राहू शकते.