Mon, Aug 19, 2019 01:09होमपेज › Konkan › सैनिकांच्या कार्याला तोड नाही : नारायण राणे

सैनिकांच्या कार्याला तोड नाही : नारायण राणे

Published On: Jan 27 2018 11:22PM | Last Updated: Jan 27 2018 10:48PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

दरदिवशी सीमेवर सैनिकांच्या शहीद होण्याच्या बातम्या  येत आहेत हे अतिशय दु:खदायक आहे. सैनिकांच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही त्यांच्या कार्यासमोर कितीही वेळा नतमस्तक झाले तरी ते कमीच आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सैन्य दलातील माजी सैनिक, शहिद कुटुंबीयांच्या सत्कार समारंभात बोलताना व्यक्‍त केले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सिद्धांत परब यांच्या  एस. पी. फिल्म कन्स्ट्रक्शन व एस.पी. फिल्म प्रोडक्शनच्या वतीने सावंतवाडी संस्थानकालिन राजवाड्यात माजी सैनिक,शहिदांच्या माता,पिता,भगिनी व त्यांच्या पत्नींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी श्री.राणे बोलत होते. माजी खा. डॉ.नीलेश राणे, वीरपिता शशिकांत कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप भानुशाली, सिद्धांतचे माजी सैनिक वडील भगवान परब, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, पं. स. सभापती रवींद्र मडगावकर, उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, सैनिक कल्याण अधिकारी धनंजय राऊत तसेच रिनिव्ह ग्रीनचे प्रमुख अजय पवार, एम. व्ही. पी. डेव्हलपर्सचे मिलिंद पाटकर, सच्चिदानंद उर्फ संजू परब, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, संदीप कुडतरकर, नगरसेविका दीपाली भालेकर, अ‍ॅड परिमल नाईक, विशाल परब आदी उपस्थित होते.

राणे  म्हणाले,सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित करणारे एस. पी. कन्ट्रक्शन व फिल्म प्रॉडक्टसचे सिद्धांत परब यांचा हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून माजी सैनिकात थोडा वेळ बसता आले हे मी माझे भाग्य समजतो, माझ्या हस्ते वीर माता, वीर पत्नीचा सत्कार झाला, त्यांचा त्याग खूप मोठा आहे, कितीही वेळा जरी नतमस्तक झालो तरी ते कमी आहे, मला सर्व सैनिकांकडे पाहिल्यावर अभिमान वाटतो, की माझ्या देशाचं संरक्षण त्यांनी केलं, कोणत्याही त्यागापेक्षा या त्यागाला शब्द कमी पडतात, असे राणे म्हणाले.

यावेळी माजगाव येथील शहीद शुभम सावंत, शहीद दीपक परशुराम सावंत, शहीद अंकुश महादेह तेजम, शहीद मनीष कदम, शहीद पांडुरंग महादेव गावडे यांच्या कुटुंबियांचा गौरव करण्यात आला.यावेळी सिद्धांत परब म्हणाले, माजी सैनिकांची दखल शासन घेत नाही. सन्मान नव्हे तर तुमचे आयुष्य समृद्ध करायचे आहे. तुमचा चरणस्पर्श व्हावा, ही अपेक्षा होती.  माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपण कायम कर्तव्यदक्ष राहू, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

माजी खा.नीलेश राणे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, वीरपिता शशिकांत कदम, राजेसाहेब खेमसावंत भोसले यांनीही मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे, भरत गावडे,  सुमेधा नाईक-धुरी यांनी केले व आभार भरत गावडे यांनी मांडले .