Fri, Jul 19, 2019 21:58होमपेज › Konkan › नाणारवर नारायणास्त्र

नाणारवर नारायणास्त्र

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:27PMराजापूर  : प्रमोद पेडणेकर

राजापूर तालुक्यातील नाणारचा परिसर सध्या राजकीय ध्रुवीकरणाचे केंद्र बनला आहे. येथील बहुचर्चित ग्रीनरिफायनरी प्रकल्प स्थानिक जनतेच्या विरोधामुळे अडकला आहे. भाजप सोडून सर्वच राजकीय पक्ष राजकीय लाभासाठी स्थानिक जनतेबरोबर आहेत. असे तूर्तास चित्र असतानाच ‘एक लोहार की..’ या थाटात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही या प्रकल्पाच्या विरोधात एल्गार ठोकला आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी सागवे येथील सभेत, नाणारची ‘रिफायनरी होणार नाही म्हणजे नाही’, असा शब्द दिला आहे. त्यामुळे प्रकल्प विरोधकांना हत्तीचे बळ आले आहे. पक्षाच्या सभेला जे जनसमर्थन मिळाले त्यावरून राणेंची विश्‍वासार्हता कायम आहे, हे अधोरेखीत झाले आहे.

निसर्गसौंदर्य व हेवा वाटावा असा सागरी किनारा हे कोकणचे वैभव आहे. या वैभवाला द‍ृष्ट लागावी असे कारस्थान आखले जाते. कोकणात पर्यटनातूनच आर्थिक समृद्धी व रोजगार निर्मितीची क्रांती होऊ शकते, हे राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखवून दिले. रत्नागिरी जिल्ह्याचा छोटा भाऊ असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘जीडीपी’ पाचव्या क्रमांकावर तर रत्नागिरी जिल्ह्याचा अठराव्या क्रमांकावर आहे. नारायण राणे यांच्या नेतृत्वाचा हा करिष्मा मानायला हवा. गेली 28 वर्षे नारायण राणेंचे नेतृत्व सिंधुदुर्गात बावनकशी सोन्यासारखे उजळून निघाले आहे. राणे यांनी या 28 वर्षांमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळण्याएवढी राजकीय मजल मारली. राज्यात महसूल, उद्योगसारखी खाती सांभाळताना ती लोकाभिमुख केली. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कालखंड तर कोकणासाठी सुवर्णकाळ होता. सिंधुदुर्गात त्यांनी विकासाचा रोड मॅप बनवितानाच पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्‍चर मजबूत केले. चिपीचे विमानतळ, मालवणचा सी-वर्ल्ड प्रकल्प किंवा कणकवलीत उभे राहात असलेले तांत्रिक व आरोग्य शिक्षणाचे प्रकल्प यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला मोठी चालना मिळाली. फलोद्यान व मत्स्य उद्योगासह अनेक समांतर जोडधंदे सिंधुदुर्गात उभे राहिले. या पाठी राणेंची राजकीय ताकद दुर्लक्षिता येणार नाही. सिंधुदुर्गात हे घडू शकते तर शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे का घडू शकले नाही याचे उत्तर या जिल्ह्यात राणेंसारखे नेतृत्व उभे राहिले नाही. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही प्रदूषणकारी प्रकल्प नाही. तरीही तेथे आर्थिक विकास साध्य झाला. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्पांची साखळी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जैवविविधतेवरही जाणवतो आहे. जनआरोग्य धोक्यात येत आहे. पण याची कुणालाही तमा नाही. या जिल्ह्याने सतत शिवसेनेला राजकीय ताकद दिली. परंतु, शिवसेनेने गेल्या 28 वर्षांमध्ये या जिल्ह्यासाठी काय केले?, हा जो प्रश्‍न राणेंनी उपस्थित केला आहे तो बिनतोड आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या छाताडावर प्रदूषणकारी प्रकल्प उभे करायचे ही हिंमत सरकारला येते कुठून? दुर्दैवानं शिवसेनेचे लोक या प्रकल्पाला आवतण देतात. भूसंपादनाचे आदेश देतात, करारावर स्वाक्षर्‍या करतात. दुसरीकडे याच प्रकल्प परिसरात जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे हे लक्षात येताच पलटी मारून आपले राजकीय थोबाड फुटेल म्हणून आंदोलनात चिथावणी देतात.शिवसेनेतला हा राजकीय गोंधळ आता स्थानिकांनाही समजून चुकला आहे. केवळ राजकीय फायद्यासाठीच शिवसेना या आंदोलनात आहे. याचा बुरखा राणेंनी काल आपल्या मेळाव्यात फाडला. ‘स्वाभिमान’च्या या मेळाव्यात नीलेश राणे, नीतेश राणे व स्थानिक प्रकल्पग्रस्तांनीही या प्रकल्पाच्या विरोधात तुफानी भाषणे केली. वास्तविक या परिसरात जे जनसमर्थन व विश्‍वास या मेळाव्याच्या निमित्ताने नारायण राणे यांनी संपादन केला त्या वरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही राजकीय टॉनिक मिळणार हे निश्‍चित झाले आहे. 

राणे यांच्या ‘रिफायनरी हटाव’ निर्धार मेळाव्यामुळे ही रिफायनरी गेल्यातच जमा आहे, एवढा विश्‍वास स्थानिक प्रकल्पग्रस्त विरोधकांत निर्माण झाला आहे. राणे यांचा वकूब, त्यांची राजकीय जरब याचा कोकणावर विशेष प्रभाव आहेच; परंतु, राज्याच्या राजकारणावर विशेषत: सरकारवरही त्यांच्या शब्दाला आदर आहे. त्यांचा रोखठोक स्वभाव व जनतेला शब्द दिला तो दिलाच, त्यात माघार नाही ही त्यांची राजकीय प्रतिमा आहे. यामुळे नाणारला हद्दपारीची नोटीस मिळाल्यागतच जमा आहे. यावेळच्या भाषणात प्रकल्पग्रस्तांच्या धडाडीचे विशेषत: महिलांच्या भूमिकेचे कौतुक केले.  प्रकल्पासाठी  जबरदस्त रेटा असतानाही खंबीरपणे ग्रामस्थ व महिलांनी जिद्दीने विरोध करीत अधिकार्‍यांना पळवून लावले. याबाबत शाबासकीची थाप देतानाच त्यांनी खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री अनंत गीते एकीकडे प्रकल्पासाठी आग्रह धरतात, दुसरीकडे स्थानिक पातळीवर जनतेबरोबर राहतात, हे ‘मॅनेज’ राजकारण आहे. शिवसेनेची राजकीय विश्‍वासार्हता केव्हाच संपल्याचा दावा त्यांनी केला व यापुढे कोणत्याही महसूल व पोलिस अधिकार्‍याने जर प्रकल्पग्रस्तांना त्रास दिला तर जालीम डोस देऊ, असा दमही त्यांनी व्यासपीठावरून दिला. त्यांच्या या भाषणातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आधार  मिळाला आहे. मोदी व शहांना नाणार कुठे माहिती आहे? नाणार हा परिसर सेनेनेच त्यांना दाखविला. त्यामुळे एकाअर्थी त्यांनी भाजपचा बचावही केला. यापुढे कोकणच्या मुळावर येणारे विध्वंसक प्रकल्प स्वीकारले जाणार नाहीत. जबरदस्तीने लादाल तर स्थानिक जनताच हिशोब करील, असा इशारा देतानाच राणे कुटुंबीय व पक्ष येथील प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने मजबुतीने उभा आहे याचे भान बाळगावे व अट्टाहास सोडावा, असेही त्यांनी खडसावले. रस्त्यावरची आंदोलनं, ठोसे देण्याचा वकूब व हातात दगड घेण्याची धमक ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांकडे आहे. राणेंना केसेसच्या धमक्या रोखू शकत नाहीत, असा शब्द त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिला. एकंदरीतच हा बहुचर्चित प्रकल्प स्थानिक जनतेच्या विरोधामुळे चर्चेत होताच; पण या विरोधाला आता राणेंची राजकीय ताकद मिळाली आहे. तूर्तास नाणारमुळे होणार्‍या राजकीय ध्रुवीकरणात राणे कुटुंबियांनी व पक्षाने आपला दम दाखविला आहे हे नक्‍की. पुढील काळात नाणारचे भवितव्य नारायण राणे यांना बगल देऊन पुढे रेटता येणार नाही,  एवढे चित्र मेळाव्यात दिसले. याची नोंद घ्यावीच लागेल.