होमपेज › Konkan › नाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन

नाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 9:04PMरत्नागिरी  : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन व जगद‍्गुरू रामानंदाचार्य यांचा जयंती सोहळा मंगळवारी उत्साहात सुरू झाला. सकाळी श्री विष्णू पंचायत यागाला सुरूवात झाली. त्यानंतर वाजतगाजत निमंत्रण मिरवणुका सुरू झाल्या. या सोहळ्यात बुधवारची शोभायात्रा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

येथील जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे हा सोहळा साजरा होत आहे. त्यासाठी सुंदरगडावर भाविकांनी मंगळवारी प्रचंड गर्दी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगडसह इतर राज्यांतूनही भाविक आले आहेत. मंगळवारी उस्मानाबाद व इंचलकरंजी येथून चालत दोन पायी दिंड्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे सकाळपासून सुंदरगडावर आणखी चैतन्य निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून भाविक खास गाड्या करून, रेल्वे व एस. टी. ने दाखल झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. देशातील प्रमुख आखाड्यांचे साधूसंत येथे सोहळ्यासाठी आवर्जून आले आहेत.

मंगळवारच्या कार्यक्रमात संतशिरोमणी गजानन महाराज मंदिरापासून दोन निमंत्रण मिरवणुका झाल्या. ढोल-ताशे व संतशिरोमणी गजानन महाराजांचा गजर करीत त्या निघाल्या. पहिलीचे यजमानपद लातूर जिल्हा समितीकडे होते. त्यांनी वरद चिंतामणीला सोहळ्याचे निमंत्रण दिले. दुसरे प्रभूरामाला निमंत्रण देण्यात आले. त्याचे यजमानपद ठाणे शहर सेवा समितीकडे आहे. बुधवारी सकाळी मुख्य गजानन महाराज मंदिर व नाथांचे माहेर येथे बुधवारी सकाळी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याचे यजमानपद अनुक्रमे पूर्व व पश्‍चिम जळगाव व पश्‍चिम पालघरकडे आहे.

बुधवारी सायंकाळी 7 वाजता प. पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन आहे. त्यानंतर 8.30 वाजता जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज याचे अमृतमय प्रवचन होईल. मंगळवारी सकाळी सद‍्गुरू काडसिद्धेश्‍वर महाराज रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिर सुरू झाले. त्याचा लाभ भाविक घेत आहेत. राज्यातील नामवंत डॉक्टर या शिबिरात सहभागी झाले आहेत. मंगळवारी दुपारी महाप्रसादाचा लाभ  असंख्य  भाविकांनी घेतला. या सोहळ्यानिमित्त सुंदरगडावरील गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. 

विविध आखाड्यांच्या साधूसंतांचा सहभाग

बुधवार सोहळ्याचा मुख्य दिवस असेल. त्यात महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश येथील लोककलांचे व कलाकारांचे दर्शन होणार आहे. जगद‍्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व देशातील अनेक आखाड्यांचे साधूसंत या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेत घडेल. ती पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी असते. सकाळी आठ वाजता ही यात्रा नाथांचे माहेर येथून सुरू होणार आहे. दुपारी सुंदरगडावर त्याचा समारोप होणार आहे..