Mon, Jun 17, 2019 02:12होमपेज › Konkan › नरेंद्रचार्य महाराजांच्या प्रेरणेतून ११ वे देहदान

नरेंद्रचार्य महाराजांच्या प्रेरणेतून ११ वे देहदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाणीज : वार्ताहर

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून देहदानाचा संकल्प केलेल्या वर्धा येथील महिलेचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. मृणालिनी दत्तात्रय कावळे असे त्यांचे नाव आहे. संस्थानच्या पुढाकारातून झालेले हे 11 वे देहदान आहे. संस्थानकडे संकल्पाचे लाखावर अर्ज आले आहेत. त्यातील 56,537 अर्ज स्वीकारले असून उर्वरित अर्ज संस्थानकडे आहेत.

वर्धा येथील मृणालिनी दत्तात्रय कावळे यांचे 22 नोव्हेंबरला निधन झाले. त्यांनी देहदानाचा अर्ज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडे भरून दिला होता. निधनानंतर त्याचे पती डॉ. दत्तात्रय कावळे यांनी संस्थानशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्रामीण रूग्णालय सावंगी (मेघे) यांच्याकडे आपल्या पत्नीचे पार्थिव सोपवले. 

संप्रदायाचे वर्धा जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी वासुदेव झाडे, सोरते, मुडे, पडोळे, भांडेकर, संजय कामडी, डॉ. कावळे यांचे नातेवाईक व भक्तांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यातून वेळेत वैद्यकीय महाविद्यालयाकडे पार्थिव सुपूर्द करण्यात आले.

मृत्यूनंतरही मानवाच्या शरीराचा उपयोग व्हावा, या भूमिकेतून नरेंद्राचार्य महाराज यांनी संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत देहदान संकल्प मोहीम राबवली. त्याला राज्यातील भाविकांनी प्रतिसाद दिला. एक लाख एक हजार अर्ज संस्थानकडे आले. 

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता पाहता 56, 537  जणांचे देहदान संकल्प अर्ज त्या-त्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. उर्वरित अर्ज संस्थानकडे आहेत. राज्यातील 40 वैद्यकीय महाविद्यालये या उपक्रमाला जोडली आहेत. या कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  महाराजांचा गौरव केला होता.  जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा हा  देहदानाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. या उपक्रमांतर्गत सप्टेंबर 2016 ते नोव्हेंबर 2017 या 15 महिन्यांतील हे 11 वे देहदान आहे. 

आजपर्यंत देहदान संकल्पपूर्ती झालेल्यांमध्ये 1) मंदाकिनी विनायकराव पांडे, नागपूर,  2) पार्वतीबाई जगन्नाथ जाधव, बोडाळा, लातूर, 3) सुलोचना रूद्राप्पा राजन्नावर, सांब्रा बेळगाव, 4) रामा काशिनाथ कुसाळकर, सोनाई, अहमदनगर,  5) शंकर हरी गरूड, येनके, सातारा,  6)  रामकृष्ण शामरावजी गोतमारे, सावनेर, नागपूर,  7)  भास्कर नाना बोरकर, नवी मुंबई, 8) ताराबाई दत्तात्रय कवाडे, पुणे,  9) गजानन सोवार पागधारे, पालघर, ठाणे, 10) भालचंद्र विश्‍वनाथ हाडगे, सोलापूर,  11) मृणालिनी दत्तात्रय कांबळे, वर्धा यांचा समावेश आहे.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजाचे ऋण फेडावयाचे असतात. त्यामुळे देहदानासारखा उत्तम पर्याय नाही. देहदानाची ही महती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी आपल्या भक्तगणांना पटवून सांगितली आणि त्यानंतर अल्पावधीत देहदानाला प्रतिसाद मिळू लागला.  आत्तापर्यंत 11 जणांनी देहदान केले आहे. त्यामुळे देहदानाचे पुण्य त्यांच्या कुटुंबीयांच्या पदरातही पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. संस्थानचे असे अनेक उपक्रम समाजोपयोगी असल्याचे दिसून आले आहे.