Sat, Apr 20, 2019 10:44होमपेज › Konkan › नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच : आ. प्रसाद लाड

नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच : आ. प्रसाद लाड

Published On: Sep 06 2018 10:08PM | Last Updated: Sep 06 2018 9:12PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रभारी आ. प्रसाद लाड यांनी येथील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गुरुवारी व्यक्‍त केली. कोकणात सुरू असलेला विकास हा भाजप सरकार करीत असून, त्याचा गवगवा मात्र केलेला नाही. त्यामुळे त्याचा फायदा अन्य उठवत असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

नाणार रिफायनरी प्रकल्प परिसरातील जनतेच्या भावनांचा अनादर न करता, त्यांना विश्‍वासात घेऊनच हा प्रकल्प शासन पूर्ण करणार आहे. देशासह कोकणच्या विकासात नाणार प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.  हजारो स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार आहे.  निवडणुकीच्या आधी येथील भूसंपादनाच्या दराचा प्रश्‍न मार्गी लागल्यास त्याचा फायदा जमीन मालकांना मिळेल, असा विश्‍वास आ. लाड यांनी व्यक्‍त केला.

शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी व कोकणात भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही  प्रभारी म्हणून आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपविली आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्गतील कार्यकारिणी सदस्यांची बैठक घेऊन पक्ष बांधणीबाबत सूचना केल्या. गुरुवारी रत्नागिरी दाखल झाल्यापासून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून कशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी तळागाळात पोहोचणार आहोत. केंद्र व राज्य शासनाने राबविलेले उपक्रम जनतेसमोर नेणार आहोत. एक बुथ-पंचवीस युथ, पंचायत समिती व जिल्हा परिषद गटामध्ये शक्‍ती केंद्र स्थापन करुन नोंदणी करण्यात येत असल्याचे आ. लाड यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांत केंद्र व राज्यात भाजप शासनाने भ्रष्टाचाराचे कुरण थांबविले आहे. 

गेली अनेक वर्ष मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे हे काम वेगाने सुरु आहे. सिंधुदुर्गमध्ये दोनपैकी एका लेनचे काम पूर्ण होत आले आहे. मे 2019पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील एका लेनचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण मिळणारच
मराठा आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले की, आरक्षण मिळणारच आहे. आंदोलनापूर्वीच शासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. समितीचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत आल्यावर 30 नोव्हेंबरपर्यंत हा प्रश्‍न मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. राम कदम यांच्या वक्‍तव्याविषयी बोलताना पक्षश्रेष्ठी याविषयी निर्णय घेतील, त्यांनी चित्रफित मागविली आहे. मात्र, कोणत्याही महिलेचा अनादर होता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.