Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Konkan › नाणारच्या जमिनींचे व्यवहार रत्नागिरीत होऊ देणार नाही

नाणारच्या जमिनींचे व्यवहार रत्नागिरीत होऊ देणार नाही

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. जमिनीच्या व्यवहारातून फायदा उठवण्यासाठी अनेक दलाल सक्रीय झाले आहेत. राजापुरात त्यांना अटकाव झाल्यानंतर आता त्यांनी आपले बस्तान रत्नागिरीत हलवले आहे. मात्र, रत्नागिरीत असे व्यवहार होत असतील तर ते उधळून लावू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी त्यांच्या सोबत शहरप्रमुख अशोक वाडेकर आणि नंदू चव्हाण उपस्थित होते. काही दलाल शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा, अडचणींचा फायदा उचलून कमी दराने जागा खरेदी करत आहेत. काही ठिकाणी टोकन रक्‍कम देऊन जागा अडवल्या जात आहेत. यातून करोडोंची उलाढाल होत आहे. दलालांचा हा डाव उघड झाल्याने राजापुरात राहून त्यांना जागेचे व्यवहार करणे अवघड जात आहे. त्यामुळे या दलालांनी रत्नागिरीत आपले बस्तान हलवले असून, आता येथूनच जमिनीचे व्यवहार होत आहेत. काही धनाढ्यांनी तर शेकडो एकर जमीन खरेदी केली आहे. गरीब शेतकर्‍याचे नुकसान होऊ नये. त्यांनी जमीन विकू नये यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नाणार आणि परिसरातील जमिनीचे व्यवहार रत्नागिरीत होत असतील तर याची माहिती नागरिकांनी आम्हाला द्यावी, असे आवाहनही आचरेकर यांनी केले आहे.