होमपेज › Konkan › नाणारप्रश्‍नी काँग्रेस स्थानिक जनतेसोबत!

नाणारप्रश्‍नी काँग्रेस स्थानिक जनतेसोबत!

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:03PM



विजयदुर्गः वार्ताहर

लोकांचा विरोध असेल,प्रकल्पात बागायती, लोकवस्ती बाधित होत असल्याने नाणार रिफायनरी प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध आहे. म्हणूनच या प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिकांसोबत काँग्रेस शेवटपर्यंत असेल, अशी ठाम ग्वाही खा. हुसेन दलवाई यांनी गिर्ये येथील भेटी दरम्यान  दिली. नाणार प्रकल्प बाधित देवगडमधील गिर्ये-रामेश्‍वर गावातील लोकांच्या भेटीसाठी व प्रकल्प बाधित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी खा.हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ शुक्रवारी आले होते.

गिर्ये येथील श्री.चौदेश्‍वर देवी मंदिरात आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठया संख्येने गिर्ये-रामेश्‍वर गावातील शेतकरी एकत्र आले होते. दोन्ही संघर्ष समितीच्यावतीने म्हणणे मांडण्यात आले. शिष्टमंडळासोबत विधान परिषदेच्या आ. हुस्नबानू खलिफे,काँग्रेसचे प्रवक्‍ते हरिष रोग्ये, माजी खा. डॉ.भालचंद्र मुणगेकर, अविनाश लाड, रमेश कीर, विश्‍वनाथ पाटील, मधू चव्हाण, विकास सावंत, राजन भोसले, कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम आदी उपस्थित होते.तसेच उल्हास मणचेकर,आरिफ बगदादी,गिर्ये सरपंच रुपेश गिरकर,रामेश्‍वर सरपंच विनोद सुके,रामेश्‍वर संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश केळकर,गिर्ये संघर्ष समिती अध्यक्ष मुनाफ ठाकुर  आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. खा. दलवाई म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात लोकांच्या मताला, विरोधाला किंमत होती. परंतु भाजप सरकारला लोकांबददल आत्मीयताच नाही.

अमेरिकेच्या धोरणानुसार भारतातील विकास प्रकल्प राबविण्याचा घाट पंतप्रधानांचा असून, ही हुकुमशाहीच असल्याचा आरोप त्यांनी केला. कोकणातील ठाणे ते सावंतवाडी पर्यंत असलेल्या  सर्व एमआयडीसी मधील रासयनिक उद्योग या कोकणचा विनाश करणा-या आहेत. कोकणातील लोक सहन करणारे असल्याने इत्‍तर सर्वजण त्याचा फायदा घेतात.पण हेच देशावर घडले तर तेथील लोक सोलून काढतील.प्रकल्पात बागायती जात असेल,लोकवस्ती असेल तर असे प्रकल्प करण्याला आमचा विरोध कायम असून ओसाड जमिनीवर हे प्रकल्प नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत.आम्ही शेतक-यांच्या खांदयाला खांदा लावून लढू,वेळप्रसंगी लाठी खाऊ,  अशी ग्वाही खा. दलवाई यांनी  दिली.

Tags : Nanar issue Congress with the local people says Husain Dalwai