Tue, Apr 23, 2019 18:04होमपेज › Konkan › रेल्वे टर्मिनसला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे!

रेल्वे टर्मिनसला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे!

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:52PMसावंतवाडी : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती उत्सवादिवशी कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबविणात येणार असल्याची माहिती  सावंतवाडी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेस सोमनाथ गावडे, अ‍ॅड. राजू कासकर,श्रीपाद सावंत, संतोष भैरवकर, अंकीत तेंडुलकर, प्रमोद तावडे ,सुमित नलावडे,  नंदू कदम, बाळा बोंद्रे, बाळू निचम आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे असणार्‍या सावंतवाडी  रेल्वे टर्मिनसला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी  स्वराज्य संघटना एकवीस हजार सह्यांची मोहीम राबविणार आहे. हा कार्यक्रम शिवजयंती दिवशी घेण्यात येणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष अमोल साटेलकर म्हणाले, दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा शिवजयंतीनिमित्त स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात शिवप्रेमींची रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली  19 तारखेला सकाळी 9 वा. राजवाड्याच्या प्रांगणात  सुरुवात करण्यात येणार आहे. रॅलीचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत-भोसले यांच्या हस्ते होणार आहे. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी,युवा मंडळे,क्रीडा मंडळ, सांस्कृतिक-सामाजिक सहकारी संस्था, सर्व राजकीय संघटना, व्यापारी संघटना, रिक्षा युनियन, शिक्षक, वकील, प्राध्यापक, डॉक्टर सहभागी होणार आहेत. 

विविध क्षेत्रातील शिवप्रेमी जनतेने एक दिवस स्वाभिमानी ज्योत तेवत ठेवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.यावेळी  दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी - काठी, ऐतिहासिक चित्ररथ, ढोल पथक, कोठावळे यांची स्केटिंग आदी विविध मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यावेळी पाहण्याची संधी  जनतेला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.