Thu, Jun 20, 2019 07:23होमपेज › Konkan › निवजे - वझरवाडी धबधबा पर्यटकांना खुणावतोय

निवजे - वझरवाडी धबधबा पर्यटकांना खुणावतोय

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 10:49PMपणदूर : प्रकाश चव्हाण

निवजे-वझरवाडी येथील धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. तेथील परिसर विकसित केल्यास चांगले पर्यटनस्थळ म्हणून हा भाग नावारूपास येईल. घावनळे-बामणादेवी वाडीला लागूनच निवजे-वझरवाडी आहे. एसटीच्या बामणादेवी या अंतिम थांब्यापासून हा धबधबा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या थांब्यापासून निवजेला जाणार्‍या कच्च्या मार्गाला लागून हा नयनरम्य धबधबा असून मागील काही वर्षापासून तुरळक प्रमाणात का होईना पर्यटक याचा आनंद लुटत आहेत.

हा धबधबा पांडवकालीन बंधार्‍यापासून सुरू होतो. पांडवकालीन बंधारा काळीथर मोठे दगड तसेच जांभा दगडापासून बांधल्याच्या खुणा आहेत. या बंधार्‍यात बाराही महिने पाण्याचा साठी असतो. हा बंधारा मधोमध ढासळल्याने नैसर्गिक झर्‍याचे पाणी बंधार्‍याच्या खालील भागातील खडकाच्या आडव्या कड्यावरून खाली कोसळत असल्याने धबधब्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धबधब्याचा हा झरा बाराही महिने जिवंत असल्याने पूर्ण वर्षभर धबधबा कोसळत असतो. दरम्यान, या धबधब्यावरून तेथील वाडीला वझरवाडी असे नाव पडल्याची माहिती तेथील धबधबाप्रेमी रहिवासी संजय पालव यांनी दिली. वझरवाडी धबधब्याचा पसिसर अगदी निसर्गरम्य आहे. धबधब्याच्या चार बाजूने हिरविगार वनसंपदा आहे. त्या भागात मानवी वस्तीपण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कच्चा रस्त्याला खेटूनच धबधबा असल्याने पर्यटकांसाठी सोयीचा आहे. दरम्यान, ह्या धबधब्याच्या  वरच्या बाजून जाणारी वाट मोकळी करणे आवश्यक आहे. तसेच तेथील कच्चा रस्ताही पक्‍का करण्याची गरज आहे. तेथील परिसर विकसीत केल्यास या धबधब्याला महत्व प्राप्त होईल.