Thu, Dec 12, 2019 08:58होमपेज › Konkan › देवरूखमध्ये मनसे-भाजपची हातमिळवणी?

देवरूखमध्ये मनसे-भाजपची हातमिळवणी?

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:21PM

बुकमार्क करा
संगमेश्‍वर : प्रतिनिधी

नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने देवरूख शहर ‘मनसे’ने आपली तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. गत निवडणुकीत ‘मनसे’ने शिवसेना-भाजपच्या नाकीनऊ आणले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी ‘मनसे’ सज्ज असतानाच ‘मनसे’ची भाजपसोबत युती झाली तर देवरुखातील राजकीय रणांगणात धुमश्‍चक्री पहायला मिळणार आहे.

आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देवरुखात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी असलेल्या विद्यमान आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचे  वृत्त असून भाजपचे ‘कमळ’ ‘इंजिन’सोबत धावणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देवरूखच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून त्यानंतर गेल्या महिन्यात प्रभागनिहाय सदस्य आरक्षण जाहीर होऊन अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत नगर पंचायतीवर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय अशी आघाडी सत्तेत आहे. आगामी निवडणुकीत हीच आघाडी एकत्रितपणे लढणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढावा, असा भाजपचा आग्रह आहे. राष्ट्रवादी याला राजी नसल्याने याच उमेदवारीवरून बिनसल्याचे बोलले जात आहे.

सेनेला शह

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या कमळाला मनसेच्या इंजिनची साथ मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी सध्या घडणार्‍या राजकीय घडामोडी याचीच साक्ष देत असून भाजपचा नवा भिडू मनसे असणार अशीच चर्चा आता देवरुखात रंगू लागली आहे.