Tue, Apr 23, 2019 21:57होमपेज › Konkan › नाणारविरोधी लढ्याकडे सामाजिक संस्थांची पाठ

नाणारविरोधी लढ्याकडे सामाजिक संस्थांची पाठ

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 9:03PMचिपळूण : खास प्रतिनिधी

बहुचर्चित नाणारविरोधी लढ्यामध्ये विविध राजकीय पक्षांनी उडी मारली असताना या प्रश्‍नाकडे सामाजिक संस्थांनी मात्र पाठ फिरवली आहे. या जिल्ह्यात याआधी आलेल्या अनेक प्रकल्पांमध्ये राज्यभरातील सामाजिक संस्था एकवटल्या होत्या. मात्र, नाणारबाबत सामाजिक संस्थांची भूमिका स्पष्ट झाली नसून या प्रकल्पविरोधी लढ्याकडे सामाजिक संस्थांनी पूर्णत: पाठ फिरविल्याचे स्पष्ट होत आहे. 

गेले सहा महिने कोकणात नाणारचा वाद पेटला आहे. नाणारविरोधी लढ्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्थानिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली. खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे शिष्टमंडळ दौर्‍यावर आले. खा. नारायण राणे यांनीदेखील विरोधी भूमिका मांडली. राष्ट्रवादीनेदेखील विरोधी सुरात सूर मिसळला. इतका विरोध असताना प्रकल्पविरोधी लढ्यात जिल्हा, परजिल्ह्यांतील सामाजिक संस्थांनी उडी घेतलेली नाही.

कोकणातील एन्‍रॉन, सेज या प्रकल्पांमध्ये सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने लढा उभा राहिला. त्यातून रायगडचा सेज प्रकल्प रद्दही झाला. रिलायन्सने खरेदी केलेल्या जमिनी ग्रामस्थांना परत मिळाल्या. एन्‍रॉनचा लढादेखील अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी लढला. या लढ्याचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. यासाठी राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते एकवटले व आंदोलन तीव्र झाले. मात्र, कोकणात होऊ घातलेल्या जैतापूर अणुऊर्जा आणि ग्रीन रिफायनरी या प्रकल्पविरोधी लढ्यामध्ये एकही सामाजिक संस्था अजून उतरलेली नाही. याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, पर्यावरणविषयक काम करणार्‍या अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र, नाणारच्या मुद्यावर एकही संस्था पुढे आलेली नाही. जंगलतोड, प्‍लास्टीकविरोधी जनजागृती, पाणलोट अशी कामे या संस्था राबवितात. परंतु कोकणात होणार्‍या अणुऊर्जा आणि रिफायनरीबाबत एकाही सामाजिक संस्थेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा राज्यस्तरावरील एकही सामाजिक कार्यकर्ता या प्रश्‍नावर बोललेला नाही किंवा दौराही केलेला नाही.